वरिष्ठांच्या आदेशाला फाटा देत एसटी कर्मचाऱ्यांची केली बदली 

कोरोनाच्या काळात राज्यातील विभाग पातळीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात बदली मिळणार नाही, असा निर्णय नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचारी वर्ग व औद्योगिक संबंध विभागाचे महाव्यवस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी घेतला आहे. मात्र, या निर्णयाला फाटा देत विभाग नियंत्रक पुणे यांनी मनमानीपणे एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापक शैलेंद्र चव्हाण यांच्या आदेशाचे अवमूल्यन केले आहे.

कोरोनाच्या काळात राज्यातील विभाग पातळीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या प्रत्येक विभाग पातळीवर कोरोनाशी सामना करण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोना काळात एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२०-२१ चालू आर्थिक वर्षात बदली न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीतील आर्थिक उपाययोजना करण्याचा भाग म्हणून बदल्यांमूळे होणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी एसटीने हा निर्णय घेतला आहे.

मात्र, एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या विभाग नियंत्रकांनी या आदेशाचे पालन न करता दोन एसटी कर्मचाऱ्यांची बदली केल्याची माहिती समोर आली आहे. यांची माहिती मिळताच एसटी महामंडळात दबक्या आवाजात जोरदार चर्चा रंगली आहे. कारण नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचारी वर्ग व औद्योगिक संबंध विभागाचे महाव्यवस्थापक शैलेंद्र चव्हाण यांचा हा पहिला निर्णय होता. या निर्णयाची प्रभावीपणे अंलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र असं न झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातवरण निर्माण झाले आहे.

मी या प्रकरणाची माहिती मागवून घेतो. आदेशानंतर कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या गेल्या असतील तर नक्कीच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळल्यास आम्ही कारवाई सुद्धा करू.
– शैलेंद्र चव्हाण, महाव्यवस्थापक, कर्मचारी वर्ग व औद्योगिक संबंध विभाग