मुंबई : नांदेडच्या (Nanded) डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात (Dr. Shankarao Chavan Government Hospital) मागील 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा (सहा मुली, सहा मुले) समावेश असल्याचे म्हटले जात आहे, तर सर्पदंश आणि इतर गंभीर आजारामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनी दिली आहे. याचपार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही राज्य सरकार अस्तित्वातच नाही म्हणत आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (The state government does not exist Sanjay Rauts venomous criticism after the Nanded tragedy demanded this)
हेही वाचा – नांदेडच्या रुग्णालयात आणखी 7 रुग्णांचा मृत्यू, मृतांची आकडेवारी 31 वर; काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचा माहिती
राज्य सरकार अस्तित्वातच नसल्यामुळे नांदेडसारख्या घटना घडल्या आहेत. सरकारी रुग्णालयात चोवीस रुग्ण चोवीस तासांत मरण पावतात. 70 रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. सरकारच्या अनागोंदी कारभाराची गेल्या वर्षभरातली ही पहिली घटना नाही आहे. महापालिका असेल किंवा सरकारी रुग्णालय असतील. कळव्याच्या पालिका रुग्णालायतही लहान बालकांसह 20 च्या वर रुग्ण चोवीस तासांत दगावले होते. अजूनही आपण या जखमा विसरलेल्या नाही आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये हीच परिस्थिती आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
कळवा रुग्णालयाच्या प्रकारानंतर अजित पवारांनी प्रश्न विचारला होता की, मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये अशी घटना कशी घडू शकते. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही. मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे पालक आहेत. मी फक्त ठाण्याचे म्हणत नाही, नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयातही औषधांचा तुटवडा आहे. पण सरकारला फक्त जमीनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात यातच अधिक रस आहे. मी एवढेच म्हणणे याक्षणी जर थोडीतरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्याचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा – तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी, नांदेड घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही?
आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात रस नसून ते वेगळ्याच कामात अडकलेले असतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते असेही म्हणाले की, नांदेडसारख्या जिल्ह्यात इतक्या प्रमाणात रुग्ण दगावतात, त्यावर सरकारकडून प्रतिक्रियाही येत नाही. संभाजीनगरमध्ये औषधे मिळत नाही, ठाण्यात रुग्णकांड झालं. त्यामुळे राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.
हेही वाचा – भाजपाच्या दृष्टीने गरिबांच्या जीवाची किंमत नाही; नांदेड घटनेनंतर राहुल गांधींचे टीकास्त्र
रुग्णालयातील अधिष्ठता काय म्हणाले?
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. श्यामराव वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा (सहा मुली, सहा मुले) समावेश आहे. या सर्वांच्या मृत्यूमागे वेगवेगळी कारणे आहेत. अपुरे कर्मचारी असतानाच काही कर्मचार्यांच्या बदल्या झाल्यामुळे मनुष्यबळाची कमतरता आहे. रुग्णसेवेवर परिणाम होऊ न देता कर्मचारी झोकून देत कर्तव्य बजावत आहेत. औषधांची खरेदी होऊ न शकल्याने रुग्णांवर उपचार करण्यात अडचण निर्माण होत आहे. 70 ते 80 किमीच्या परिसरातील मोठ्या संख्येने रुग्ण शासकीय रुग्णालयातच येत असल्याने कर्मचार्यांवर कामाचा ताण आहे, असे डॉ. श्यामराव वाकोडे म्हणाले.