मुंबई : राजकीय उलथापालथीनंतर आता राज्यातील राजकारण आरक्षणाच्या मागणीभोवती फिरताना दिसत आहे. एकीकडे पक्षा-पक्षातील फूटीनंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू असताना दुसरीकडे मराठा, धनगर, ओबीसी समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. असे असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर थेट हल्ला चढवत राज्य सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळत असून, त्यांना खोटी अश्वासने देत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. (The state government is making false promises to the Maratha community Attack of Sushma Andahare)
मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोनवेळा उपोषणं करून सरकारला 24 डिसेंबरचा अल्टीमेटम दिला असून, सध्या ते राज्यभर दौरे करत आहेत. सोबतच धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीचे हत्यार उपसल्याने राज्य सरकार आरक्षणाच्या मागणी करणाऱ्यांच्या चक्रव्यूव्हात अडकतेय की काय अशी शक्यता व्यक्त केली जात असताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
या शब्दांत डागले राज्य सरकारवर टीकास्त्र
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर राज्य सरकारच्या भूमिकेवर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तरीही राज्य सरकार मराठा समाजाला खोटी आश्वासने देत आहे. हा प्रश्न केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात येतो. भाजपला याची कल्पना आहे. तरीही या प्रश्नाचा जाणीवपूर्वक खेळखंडोबा केला जात आहे. मूळात मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची इच्छाच नाही. त्यामुळेच मागच्यावेळी आरक्षण देताना त्रुटी ठेवल्या असल्याचा गौप्यस्फोटही अंधारेंनी यावेळी केला.
हेही वाचा : “…तर जरुर गुन्हे दाखल करा”, मनोज जरांगेंचे सरकारला थेट आव्हान
मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर
सत्ताधारी विरोधक आरोप प्रत्यारोप करीत असतानाच दोनवेळा उपोषण करून महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले असून, त्यांनी आरक्षण मिळेपर्यंत अंतरवाली सराटीत जाणार नसल्याची भूमिकाही स्पष्ट केली आहे.
हेही वाचा : Kapil Dev : विश्वचषक सामन्याचे आमंत्रण नाही, पण पराभवानंतर कपिल देव यांचा भारतीय संघाला…
नीलम गोऱ्हेंचाही घेतला समाचार
राज्य सरकारवर हल्ला करणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचाही खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नैतिकता गमावली असून, त्यांनी राजकारण आणि समाजकारणाबद्दल बोलू नये असेही त्यांनी यावेळी त्यांना सुनावले.