घरमहाराष्ट्रराज्यातील सरकार 50 कोटींच्या खोक्यांवर उभे, ठाकरे गटाचे टीकास्त्र

राज्यातील सरकार 50 कोटींच्या खोक्यांवर उभे, ठाकरे गटाचे टीकास्त्र

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या मनात 50 आमदारांची प्रतिमा ‘खोकेवाले’ अशीच आहे व हे आमदार कोठेही गेले तरी त्यांना ‘खोकेवाले’ असेच म्हटले जाणार. पन्नास आमदारांचे सरकार हे बेकायदेशीर आहे. घटनेच्या पायावर ते उभे नसून प्रत्येकी पन्नास कोटींच्या खोक्यांवर ते उभे आहे. त्यामुळे त्यांच्यात एकजिनसीपणा नाही. नैतिकता आणि विचारांचे सूत्र नाही. महाराष्ट्राविषयी आस्था नाही, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकरावर टीकास्त्र सोडले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या वादाचा संदर्भ घेत भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मिंधे गटाचे एक मंत्री गुलाब पाटील यांनाही खोक्यांचा आरोप काट्यांप्रमाणे टोचला आहे व त्यांनीही खोक्यांचा आरोप करणाऱ्या आमदार रवी राणा यांच्यावर डोळे वटारले. मात्र याच गुलाब पाटलांवर त्यांच्याच जिल्ह्यातील मिंधे आमदार चिमण पाटील यांनी हल्ला केला. कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. कुणी कुणाचे ऐकत नाही. राज्याची इज्जत खुंटीला टांगून सरकार चालवले जात आहे, अशी बोचरी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे.

- Advertisement -

शेतीमंत्री अब्दुल सत्तार यांनी तर बीडच्या कलेक्टरला भर बैठकीत विचारले, ”आपण दारू वगैरे पिता की नाही?” कलेक्टर यांनी सांगितले, ”होय, आम्ही पितो अधूनमधून.” यावर सत्तारांच्या मागून कुणी तरी जिभेची टाळी वाजवली- ”आमचे साहेब दारू पित नाहीत, पण खोके घेतात!” असा एकंदरीत महाराष्ट्राच्या इज्जतीचा खेळखंडोबा जागोजाग सुरू आहे. राज्याच्या प्रश्नांवर ना मुख्यमंत्री बोलतात ना त्यांचे वाचाळ मंत्री, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

‘खोक्यांचा आरोप मी कदापि सहन करणार नाही’, असे बच्चू कडू यांनी तळमळून सांगितले. कडू यांनी अपंगांसाठी आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले, पण एकदा गुवाहटीला गेल्याने त्या कामावर बदनामीचे ‘खोके’ पडले. मिंधे-फडणवीसांच्या सरकारने प्लास्टिक बंदीप्रमाणे उद्या राज्यात खोकेबंदी केली तरी आश्चर्य वाटायला नको, कारण कोणतेही खोके दिसले की लोकांना पन्नास बेइमान आमदारांचीच आठवण होणार. या बेइमानांच्या राजकीय चिताही खोके रचून पेटविल्या जातील, असा संताप लोकांत खदखदत आहे. आज तुम्ही एका राणांना समजावले, पण अमरावती व राज्याच्या जनतेला कसे समजावणार? आणि किती लोकांवर बदनामीचे खटले दाखल करणार? असे सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या अग्रलेखातून केले आहेत.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -