घरमहाराष्ट्रठाकरे सरकारला धोका नाही!

ठाकरे सरकारला धोका नाही!

Subscribe

शरद पवार यांचा निर्वाळा, काँग्रेस- राष्ट्रवादी उद्धव यांच्या पाठीशी

राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून महाराष्ट्र सरकारला कोणताही धोका नाही, असा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिला.महाराष्ट्र विकास आघाडीतील सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. जर सध्याच्या परिस्थितीत आमदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला तर जनता माफ करणार नाही, असा इशाराही पवार यांनी भाजपला नाव न घेता दिला. देवेंद्र फडणवीस उगाच उतावीळ होत असल्याचेही पवार म्हणाले.

करोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर पवार यांनी काल उशीरा ’मातोश्री’ वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. पवार- ठाकरे गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी काल राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्याने राजभवनाच्या आडून केंद्र सरकार महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी राज्यपाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत खुलासा केला.राज्यपालांची भेट घेतली यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यांनी दोन वेळा चहासाठी निमंत्रण दिले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये राहण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे पवार म्हणाले. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. करोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर कसे काढायचे आणि त्यासाठी सगळी ताकद लावायची हे सध्या सरकारचे उद्दिष्ट आहे. तिन्ही पक्षाची हीच भूमिका आहे, असेही पवार यांनी सांगितले.

भगत सिंह कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून एकदाही त्यांना भेटलो नव्हतो. त्यांनी चहासाठी दोन वेळा निमंत्रण दिले होते. म्हणून काल त्यांना भेटायला गेलो होतो. मुख्यमंत्री महाराष्ट्रात चांगले काम करत आहेत. तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात, असे राज्यपाल म्हणाल्याचे पवारांनी सांगितले.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी नेहमी आढावा घेतो. नेहमी स्मारकवर भेटतो. काल मीच मातोश्रीला येतो असे उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एकदाच ’मातोश्री’वर गेलो होतो. यावेळी आम्ही कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. कोरोना काळात कशी काळजी घेतली पाहिजे याची चर्चा झाली. कुठे किती रुग्ण आहेत? पावसाळ्यात काय काळजी घ्यायची? रुग्ण संख्या वाढते आहे यावर चर्चा झाली, असेही पवार म्हणाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींसह इतर गप्पा झाल्याचेही पवारांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -