घरमहाराष्ट्रराज्यातील पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

राज्यातील पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत भाषण करताना मशिदींवरील भोंगे हटवले नाही, तर 4 मे पासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे सरकारला दिला होता. या इशार्‍याला गांभीर्याने घेत राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य पोलीस दल अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत भाषण करताना मशिदींवरील भोंगे हटवले नाही, तर 4 मे पासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे सरकारला दिला होता. या इशार्‍याला गांभीर्याने घेत राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य पोलीस दल अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिसा बजाविण्यास सुरूवात केली असून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. त्यातच इतर राज्यातील लोकांकडून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचला जात असल्याची माहिती देखील गुप्तचर विभागाकडून पोलिसांना देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पोलिसांसह एसआरपीएफच्या 87 तुकड्या, 30 हजार होमगार्ड पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सर्व पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 455 जणांना 144 सीआरपीसी, 801 जणांना 149 सीआरपीसी, 172 जणांना 151 (3) सीआरपीसी कलमांतर्गत नोटीस बजाविली आहे. त्यात मनसेसह इतर हिंदू संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

मशिदीच्या भोंग्यावरुन बुधवारपासून मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बैठका घेत मंगळवारी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी गुप्तचर विभागाने एक अहवाल सादर केला असून त्यात मुंबईबाहेरुन येणार्‍या काही परप्रातियांकडून जातीय दंगली घडविण्याचा कट असल्याचा नमूद करण्यात आले होते. त्याची गृहविभागाने गंभीर दखल घेत अशा समाजकंटकावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत कुठेही हलगर्जीपणा करु नका, कोणाच्या आदेशाची वाट पाहू नका असे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना सांगितले.

- Advertisement -

या बैठकीनंतर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सर्वसामान्यांनी कायदा आणि सुव्यव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे. मात्र कोणीही कायदा हातात घेणार असेल तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली असा इशाराही दिला.

अनुचित घटना घडू नये म्हणून मुंबईसह राज्यातील प्रमुख शासकीय, निमशाकीय कार्यालय, महत्त्वाचे धार्मिक स्थळे, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांसह 87 एसआरपीएफच्या तुकड्या, 30 हजार होमगार्डला तैनात करण्यात आले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी राज्य पोलीस सक्षम असल्याचा निर्वाळा रजनीश शेठ यांनी दिला. राज्यात दंगली घडविण्याचा डाव हाणून पाडला जाईल. तसेच शांतता राखण्यासाठी आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी मोहल्ला समितीसह अनेक सामाजिक संस्थेची मदत घेतली जात आहे. तरीही काही गुन्हेगार आणि समाजकंटकाकडून कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही जातीय तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा कारवाईस सज्ज रहा असा इशाराच रजनीश शेठ यांनी दिला आहे.

हातात घेणार्‍यांवर कडक कारवाई करू– रजनीश शेठ
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, १5 हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून, १३ हजार लोकांना कलम १४९ अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य कोणीही करु नये, कायदा हातात घेणार्‍यांची गय केली नाही, कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करू.

यांना अटक यांना नोटिसा
मनसेचे चांदिवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपर येथे मशिदीसमोर हनुमान चालिसा लावल्याप्रकरणी भानुशाली यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांना मंगळवारी बर्वेनगर स्मशानभूमी येथून अटक केली. भानुशाली यांच्या चांदिवली येथील कार्यालयातून लाउडस्पीकर्सही जप्त करण्यात आले आहेत. तर मनसेचे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, संतोष धुरी आदी नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

आता नाही, तर कधीच नाही

प्रश्न असा आहे की, सर्व भोंगे हे अनधिकृत आहेत. भोंगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी. देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे, आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत, परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही.

कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सर्व पोलीस अधिकार्‍यांना माझी हात जोडून विनंती आहे की, या देशात या राज्यात कायद्याचं राज्य आहे हे त्यांनी दाखवून द्या. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यावर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यानी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणार्‍या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -