औरंगाबाद : राज्यात उशीरा दाखल झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे हाताशी आलेलं पीक करपू लागले आहे. त्यामुळे मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात (Marathwada) यंदाही पावसाने दडी मारल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून शेतकरी संकटात सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचा वेग प्रचंड वाढला आहे. शेतकरी आत्महत्येंनी उच्चांक गाठला असून सर्वाधिक आत्महत्या कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड (Beed) जिल्ह्यात आहेत. (The terrible reality of Balirajas suicide in Marathwada Highest number in the district of Minister of Agriculture)
राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत गेल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी माझा पहिला प्रयत्न करणार असा दावा केला होता. मात्र फक्त मराठवाड्यात मागील आठ महिन्यांत म्हणजेच 1 जानेवारीपासून ते 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील तब्बल 685 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपले जीवन संपवले आहे. म्हणजेच प्रत्येक दिवशी 2 ते 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केलेला दावा फोल ठरताना दिसत आहे. तसेच शेतकरी रोखण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्नही निरुपयोगी ठरताना दिसत आहेत.
हेही वाचा – ठाकरेंच्या जळगाव दौऱ्याआधी महाराष्ट्र शासनाचं महापालिका आयुक्तांना पत्र; संजय राऊत म्हणतात…
मराठवाड्यातील आत्महत्यांचा वेग चिंताजनक
मराठवाड्यातील कर्जबाजारीपणा, नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्यावर्षी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या काळात मराठवाड्यातील 1 हजार 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे यावर्षी फक्त महिन्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा 685 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आत्महत्येचा हा वेग चिंताजनक असल्याचे आता बोलले जात आहे.
मागील तीन वर्षातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी
मागील तीन वर्षात तब्बल 2 हजार 682 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या काळात मराठवाड्यातील 773 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या काळात मराठवाड्यातील 887 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या काळात मराठवाड्यातील 1022 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
हेही वाचा – ते स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेत असतील मात्र…; ठाकरेंची मोदींवर सडकून टीका
मागील आठ महिन्यातील मराठवाड्यातील आत्महत्येची आकडेवारीट
- जिल्हा – आत्महत्या
- औरंदाबाद – 95
- जालना – 50
- परभणी – 58
- हिंगोली – 22
- बीड – 186
- लातूर – 51
- नांदेड – 110
- उस्मानाबाद – 113
- एकूण – 685