ठाणे खाडीप्रश्नी सत्ताधाऱ्यांतच जुंपली, मंत्र्यांच्या उत्तरांवर आमदारांचा आक्षेप

Maharashtra Assembly Budget 2023 | सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाणांसह विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनीही याप्रश्नी दीपक केसरकरांना प्रश्न विचारला. याबाबत लवकरच बैठक बोलावून चर्चा केली जाईल, असं आश्वासन दीपक केसरकरांनी दिलं. 

thane khadi issue in maharashtra assembly budget

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – विविध प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. मात्र, विधानसभेत आज सत्तधारी पक्षातील आमदारच एकमेकांसोबत भिडले. ठाणे खाडीतील प्रदूषण प्रश्नी चर्चा सुरू असताना मंत्र्यांनी चुकीचं उत्तरं दिली असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार, प्रताप सरनाईक आणि अतुल भातखळकर यांनी केला आहे. त्यामुळे याबाबत सुधारित उत्तर देण्याची मागणी सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनीही केली.

ठाणे खाडीला रामसर दर्जा मिळाला असला तरीही खाडीतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे आशिष शेलारांनी आज सभागृहात सांगितले. या खाडीत तीन डम्पिंग ग्राऊंडमधून सांडपाणी आणि एमआयडीसीतील कारखान्यातून रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. विषारी रसायनांमुळे माशांच्या पुनरुत्पादनावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे, असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केला होता. यावर मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तरे दिली. खाडीत प्रदूषण होत असलं तरीही डम्पिंग ग्राऊंडमधील पाणी खाडीत सोडले जात असल्याचे त्यांनी अंशतः मान्य केले. तर, ठाणे खाडीतील रसायनमिश्रित पाण्यामुळे माशांच्या पुनरुत्पादनावर परिणाम होत नसल्याची तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती केसरकरांनी दिली. खाडीतील प्रदूणषप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती केसरकरांनी दिली.

मात्र, मंत्री दीपक केसरकरांनी उत्तर दिल्यानंतर आशिष शेलार, प्रताप सरनाईक आणि अतुल भातखळकर यांनी या उत्तरावर आक्षेप घेतला. खाडीकिनारा माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. मंत्र्यांनी उत्तर चुकीचं आहे. ठाणे खाडीला रामसर दर्जा मिळाला. फ्लेमिंगो खाडी किनारी येत होते. परंतु, आता ठाणे खाडी दुषित झाल्याने आता फ्लेमिंगोचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेतील दूषित पाणी ठाणे खाडीत सोडलं जातं. खाडी स्वच्छ होण्याकरता गेल्या २५ वर्षांत काहीही प्रयत्न झालेलं नाही. राज्यातील प्रदुषण खातं ठाण्यातील खाडी प्रदूषित होणार नाही आणि फ्लेमिंगोचे प्रमाण वाढेल याची दक्षता घेणार का, परदेशात जी साधनसामुग्री वापरली जाते ती येथे वापरता येईल का, आजूबाजूच्या पालिकांना नोटीसा बजावून पाणी सोडण्यास मज्जाव करणार का? असे प्रश्न प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केले. या संदर्भात बैठक बोलावून सर्वांच्या उपस्थित यावर चर्चा केली जाईल. मी मासेमारीविषयी आक़डेवारी दिली होती, फ्लेमिंगोसंदर्भातील आकडेवारी दिली नव्हती, त्यामुळे माझं उत्तर चुकीचं आहे, असं म्हणू नये, असं केसरकर यांनी स्पष्ट केलं.

प्रताप सरनाईक यांच्यासह भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही मंत्री दीपक केसरकर यांच्या उत्तरावर थेट आक्षेप घेतला. त्या आक्षेपावर उत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले की, “खाडीतील प्रदूषण वाढत असल्याच्या प्रश्नावर नाही असं उत्तर दिलं. खाडी आधीपासूनच प्रदूषित आहे. पण आता नव्याने प्रदूषण वाढलं नसल्याचं मी माझ्या उत्तरात म्हटलं आहे.

सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाणांसह विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनीही याप्रश्नी दीपक केसरकरांना प्रश्न विचारला. या उत्तरात सुधार न केल्यास आम्ही तुमच्याविरोधात हक्कभंग आणू शकतो, असा इशारच नाना पटोले यांनी दिली. याबाबत लवकरच बैठक बोलावून चर्चा केली जाईल, असं आश्वासन दीपक केसरकरांनी दिलं.