केंद्राच्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आदित्य ठाकरेंचा खरा चेहरा समोर, नितेश राणेंची टीका

सिंधुदुर्ग (तेजस्वी काळसेकर) : एका बाजूला पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची बदनामी करायची, प्रकल्प पळवतात म्हणून बोंब मारायची आणि केंद्राचे जे प्रकल्प आले आहेत त्याला विरोध करायचा, अशी नीती शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची आहे. त्यांच्या शब्दावर आम्ही नेमका विश्वास कसा ठेवायचा? अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज केली.

आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे रिफायनरीबाबत समर्थन व आपली भूमिका जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरेंवर चौफेर टीका केली. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना एव्हढीच जर तरुणांच्या रोजगाराची चिंता होती तर, त्यानी खासदार विनायक राऊत यांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले पाहिजे होते, असे मतही नितेश राणे यांनी व्यक्त केले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजपा पदाधिकारी बाळ प्रकाश राणे, संदीप साटम, योगेश पाटकर, दयानंद पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

आमदार राजन साळवी या मिटिंगला उपस्थित राहिले, त्याचे आपण स्वागत करतो; मात्र महाराष्ट्रात प्रकल्प येत नाहीत, असे सांगत फिरायचे आणि आलेल्या प्रकल्पांना विरोध करायचा ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची नीती असून राज्य सरकारवर केलेले आरोप फक्त राजकीय दृष्टिकोनातून केले असल्याचे यातून सिद्ध होते, असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे हिंदुत्ववादी कसे?
आदित्य ठाकरे यांनी बिहारमध्ये राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या पुत्राची भेट घेतली. त्याबाबत नितेश राणे म्हणाले, लालूप्रसाद यादव यांनी राम जन्मभूमीसंदर्भात निघालेल्या रथयात्रेला विरोध केला होता. त्यांच्याच पुत्राला आदित्य ठाकरे भेटायला जात असतील तर प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू स्वतःला हिंदुत्ववादी कसे म्हणवून घेतात? याचे उत्तर त्यांनीच दिले पाहिजे, असेही आमदार नितेश राणे यानी सांगितले.

दिशा सालियनच्या मृत्यूबाबत संशय कायम
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नितेश राणे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन प्रकरणाबद्दलही वक्तव्य केले. दिशा सालिअन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबईच्या मालाडमधील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे सरकार होते, त्यांनी त्यासंबंधीचे पुरावे नष्ट केले असले पाहिजेत. यामुळे सीबीआयला नेमके काय सापडले? त्यांनी शवविच्छेदन अहवाल पाहिला का? त्यामध्ये काय लिहिले आहे? याची सविस्तर माहिती घ्यावी लागेल, असे नितेश राणे म्हणाले. दिशा सालियन प्रकरणात अनेक पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही. हे लक्षात घेता यामध्ये दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबतचा संशय कायम आहे आणि आपण या मतावर ठाम आहोत, असे त्यांनी सांगितले.

सुषमा अंधारे यांच्याबाबत ‘नो कॉमेन्ट्स’
शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यानी सिधुदुर्गात येऊन राणे कुटुंबीयावर टीका केली होती. यावर पत्रकारांनी छेडले असता आमदार नितेश राणे यानी ‘नो कॉमेंट्स’ अशी प्रतिक्रिया दिली. मात्र याबाबत सविस्तर उत्तरे आमच्या महिला आघाडीने दिली आहेत, यामुळे मी वेगळे उत्तर देण्याची गरज नसल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.