घरमहाराष्ट्रनाशिकवाढदिवसाच्या दिवशीच अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

वाढदिवसाच्या दिवशीच अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने घरातील थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेतले, जेवण झाले आणि रात्री अकरा वाजता घरापासून थोड्याच अंतरावर दुचाकीच्या अपघातात त्याची प्राणज्योत मालवली. नाशिकरोडच्या बिटको परिसरात हदय पिळवटून टाकणारी घटना घडली. उपनगर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, बुधवारी (दि.२७) रात्री अकरा वाजता बिटको चौकालगत ठाकूर ज्वेलर्स समोरुन शिवराज विक्रम कावळे (२५, रा. रजनी बंगला, हाॅटेल विश्वंभरच्या मागे, दत्त मंदीर) हा रात्री अकरा वाजता त्याची अॅक्टिव्हा गाडी (एमएच १५ जी.डी.२२८९) वरुन घरी जात असताना एका बुलेटचालकाने त्यास धडक दिली. अपघाताचा आवाज ऐकून शिवराजचा मित्र मुनाफ दाऊद शेख हा धावत घटनास्थळी गेला. मात्र, बुलेट चालक तेथून फरार झाला. शेख याने इतरांच्या सहाय्याने येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण, काका-काकू, चुलत भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

कुटुंब, नातेवाईक व मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर

शिवराजचा मित्र मुनाफ शेख यांनी सांगितले, बुधवारी (दि.२७) रोजी शिवराजचा २५ वा वाढदिवस असल्याने आई वडिल, बहिण, काका-काकू व कुटुंबियांसमवेत वाढदिवस साजरा करुन सर्वांचे आशिर्वाद घेतले. जेवण केले, त्यानंतर काॅलनीतील थोरा मोठ्यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर काहीतरी आणायला बाहेर पडला आणि अपघातात दुर्दैवी अंत झाला. वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने कुटुंब, नातेवाईक व मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -