बॉलिवूडने जगात देशाचं नाव उंचावलं, संपूर्ण देश त्यांच्या पाठिशी – अनिल देशमुख

Anil Deshmukh has filed an application in the High Court for voting in the Rajya Sabha elections

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज अँगल समोर आला. ड्रग्ज अँगलप्रकरणी तपास यंत्रणांनी तपास करायला सुरुवात केली. काही अभिनेत्रींची चौकशी देखील झाली. यावरुन काहींनी बॉलिवूडला ड्रगिस्टचा अड्डा म्हणत बॉलिवूड कलाकारांवर टीका केली जात आहे. या टीकेला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख उत्तर दिलं आहे. बॉलिवूडने जगात देशाचं नाव उंचावलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडसोबत आहे, असं मत देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विट करत त्यांची भूमिका मांडली आहे. “केवळ काही लोकांच्या ड्रग्ज घेण्यामुळे संपूर्ण बॉलिवूडचं नाव खराब करणं चुकीचं आहे. जे कोणी ड्रग्ज प्रकरणात सामिल आहेत त्यांच्यावर कारवाई पण होत आहे. मात्र, बॉलिवूडने जगभरात देशाचं नाव उंचावलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे,” असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज अँगल समोर आला. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीसह बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिका जसं दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांचीही नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं (एनसीबी) चौकशी केली आहे. ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक देखील झाली होती. ती सध्या जामिनावर बाहेर आहे. तर अभिनेत्री कंगना राणावतने वारंवार बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांचा मुद्दा उचलून धरत ती सातत्याने बॉलिवूडवर निशाणा साधत आहे. सुशांतसिंह प्रकरणावरुन तीने मुंबई पोलीस आणि महाविकास आघाडी सरकारलाही लक्ष्य केलं आहे.