साखरपुडा होताच होणाऱ्या बायकोचा चिरला गळा, कारण…

jalna murder case

जालना – जालन्यातील बेलोरा तांड्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. शरीरसुखाला नकार दिल्याने होणाऱ्या बायकोचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून संशयित आरोपी फरार झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या मुलीची हत्या झाली ती अल्पवयीन होती.

मंठा तालुक्यातील बेलोरा तांडा येथील सपना जाधव (१७) हिचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात वरूड येथील सुशील पवार या तरुणासोबत ठरला होता. या दोघांचा १५ दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला. लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंबीयांनी बोलणी करून शनिवारी बस्ता करण्याचे ठरवले. यासाठी ते लोणार येथे बस्ता बांधण्यासाठी आले. सुशील पवारसुद्धा बस्त्याला आला. मात्र, सपना तेथे आली नव्हती. त्यामुळे सुशील मुलीला भेटण्याकरता बेलोरा तांडा येथे गेला. यावेळी सपना एकटीच घरी होती. त्यामुळे त्याने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने नकार दिल्याने दोघांमध्ये वादावादी झाली. यातूनच त्याने तिची गळा चिरून हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


दरम्यान, घरातील लहान मुलं हत्येचे प्रत्यक्षदर्शी होते. त्यांनी लागलीच ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी बस्त्यासाठी गेलेल्या दोन्ही मंडळींना घरी बोलावून घेतलं. सुरुवातीला काय झालंय याची माहिती देण्यात आली नव्हती. पोलीस येईपर्यंत वराकडील मंडळींना एका घरात सुरक्षित कोंडून ठेवण्यात आलं होतं. पोलीस गावात दाखल होताच वधुकडील मंडळींना हत्येबाबतची माहिती देण्यात आली.

संशयित आरोप फरार असल्याने वधुकडील मंडळींनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेला. आरोपीला अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात गेणार नसल्याची भूमिका कुटुबीयांनी घेतली. मात्र, पोलिसांनी कुटुबीयांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह नेला. दरम्यान, फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.