घरताज्या घडामोडीअंत्यसंस्कारापूर्वीच महिलेचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

अंत्यसंस्कारापूर्वीच महिलेचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

Subscribe

करोना संशयित एका महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देत असतानाच, त्या महिलेचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांसह जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. विशेष म्हणजे, मृतदेह तब्बल ७ तास नातेवाईकांच्या ताब्यात होता. हा मृतदेह नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयातून नेला की जिल्हा रूग्णालयाने नातेवाईकांच्या ताब्यात दिला, यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

पंचवटीतील फुलेनगर येथील ६५ वर्षीय करोनासंशयित महिलेला डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी तिला तेथून जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. महिलेचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी (दि.२१) महिलेचा मृत्यू झाला. जिल्हा रूग्णालयाकडून महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीपूर्वी घरी आणला. तितक्यात या महिलेचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा रूग्णालयाला समजले. त्यानंतर रूग्णालयाच्या पथकाने तातडीने हालचाल करत रविवारी मध्यरात्री धाव घेत संबंधित महिलेचा मृतदेह नातेवाईकांकडून ताब्यात घेत नियमानुसार अंत्यसंस्कार केले.
अंत्यविधीची तयारी सुरू असताना महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांची मात्र चांगलीच धावपळ झाली. त्यांच्यामध्ये भिती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी जिल्हा रूग्णालयाशी संपर्क साधला असता रूग्णालयाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली होती. मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यापूर्वी रूग्णालय स्तरावरुन खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असे रूग्णालयाचे म्हणणे आहे. तर, नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मृतदेह ताब्यात देण्यापूर्वी रूग्णालयाकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -