पीडीएफ स्वरूपातील वृत्तपत्रांची चोरी; कठोर कारवाईची मागणी

वाचकांच्या सोयीसाठी अनेक वृत्तपत्रे ई-पेपरच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु यातही माहितीची चोरी करून वृत्तपत्रांच्या बनावट प्रती पीडीएफ स्वरूपात सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्या जात आहेत.

लॉकडाऊनच्या काळात देशातील काही माध्यम समूहांना वृत्तपत्रांचे वितरण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेकांनी ऑनलाइन माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे धोरण स्वीकारले आहे. वाचकांच्या सोयीसाठी अनेक वृत्तपत्रे ई-पेपरच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु यातही माहितीची चोरी करून वृत्तपत्रांच्या बनावट प्रती पीडीएफ स्वरूपात सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्या जात आहेत. याबाबत इंडियन न्यूजपेपर सोसायटीने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे रोखण्यासाठी काही शिफारशी ही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

यातील काही माध्यम समूह ही सेवा सशुल्क, तर काहीजण निःशुल्क पुरवित आहेत. हे ई-पेपर संबंधित माध्यम समूहाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात. मात्र, या डिजिटल स्वरूपातील वृत्तपत्रांचीही चोरी होऊ लागली आहे. इंटरनेटवरील अनेक युजर्स ऑनलाइन वृत्तपत्र कॉपी करून त्याची पीडीएफ तयार करत आहेत आणि व्हाट्सअँप, टेलिग्रामवर प्रसारित करत आहेत. यामुळे माध्यम समूहाचा महसूल बुडतो. अशा प्रकारे पीडीएफ करणे पूर्णपणे बेकायदा असून याविरोधात अनेक माध्यम समूह कारवाई करत आहेत.

इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या सरचिटणीस मेरी पॉल यांनी माध्यम समूहांसाठी काही शिफारशी केल्या आहेत.

* वृत्तपत्रे अथवा त्यातील काही भाग सर्वत्र पसरविणे हे पूर्णपणे बेकायदा असून असे करणाऱ्यांविरोधात सक्त कारवाई करून त्यांना जबर दंड आकारण्यात येईल, असा इशारा माध्यम समूहांनी अँप, संकेतस्थळ आणि वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध करावा.

* याशिवाय, कोणतीही कायदेशीर कारवाई केल्यास, त्याबाबतची बातमी आणि गुन्हेगाराविरोधात सुरू असलेल्या खटल्याबाबतची माहिती प्रसिद्ध करावी, आणि इतरांना असे करण्यापासून परावृत्त करावे.

* बेकायदा प्रसिद्धी देणाऱ्यांविरोधात विशेषतः व्हाट्सअँप, टेलिग्राम ऍडमिनविरोधात कायदेशीर कारवाई करावी.

* पीडीएफ आणि इमेज डाऊनलोड करण्यास मर्यादा घालून द्यावी.

* पाने कॉपी होण्यापासून रोखण्यासाठी जावा स्क्रिप्ट कोडचा वापर करावा.

* स्क्रीनवर न दिसणारा युजर आयडेंटिफायर कोड इन्सर्ट करावा, जेणेकरून सोशल मीडियावर फिरणाऱ्या पीडीएफच्याद्वारे त्या पीडीएफ अपलोड करणाऱ्यांपर्यंत पोहोचता येईल.

* एका आठवड्यात संकेतस्थळावरूननिश्चित संख्येपेक्षा अधिक वेळा पीडीएफ डाऊनलोड करणाऱ्यांची यादी तयार करावी, आणि त्यांना ब्लॉक करावे.