…तर मुख्यमंत्री या नात्यानं आदित्य ठाकरे निर्णय घेतील, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानानं एकच खळबळ

परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या विधानानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. अजितदादांनी अनवधानानं काही होईना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हटलंय. पुण्यातील जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. त्यावेळी ते मुख्यमंत्री आदित्य ठाकरे बोलून गेले.

Ajit Pawar
Ajit Pawar

पुणेः गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्याप समोर आलेले नाहीत. अधिवेशनातही मुख्यमंत्री येतील, असं वाटत असतानाच त्यांनी तिकडेही उपस्थिती दर्शवली नाही. त्यानंतर विरोधकांपैकी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरेंकडे देण्याचा सल्ला दिला होता. त्यावरूनही बराच गदारोळ झाला होता.

परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या विधानानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. अजितदादांनी अनवधानानं का होईना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हटलंय. पुण्यातील जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. त्यावेळी ते मुख्यमंत्री आदित्य ठाकरे बोलून गेले.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील नागरिकाच्या जिवाशी खेळून चालणार नाही. आरोग्य चांगलं ठेवावं लागेल. त्याठिकाणी रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी केलेली आहे. बाकी सगळं सुरू ठेवलंय. परंतु नियमाचं पालन करून सुरू ठेवलेलं आहे. तशाच पद्धतीनं पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढली. तर याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं आदित्य ठाकरेसाहेब घेतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाल्यानं विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय.

मी नियमाचा काटेकोर पालन करणारा आहे. गर्दी होऊ नये म्हणून काही काही ठिकाणी माझे 10 वाजताचे कार्यक्रम 7 वाजता उरकले, बाकीचे सगळे कार्यक्रम रद्द केले. आज बैठकीला नसतो आलो तर ब्रेकिंग न्यूज चालली असती. अजित पवार अजूनही नाराज, पुणे जिल्हा मध्यवर्ती बोर्ड मीटिंगला गैरहजर, असं नाही झालं. पण तुमच्याशी बोलल्यानंतर मी आता जाणार असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.
——————————————————-
हेही वाचा : बँका चालवणं स्पर्धात्मक, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया