Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र 'तर मग माझी हकालपट्टीच करून टाका'; उपनेतेपदाला माजी मंत्री बबन घोलपांचा जय...

‘तर मग माझी हकालपट्टीच करून टाका’; उपनेतेपदाला माजी मंत्री बबन घोलपांचा जय महाराष्ट्र

Subscribe

नाशिक : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते तथा माजीमंत्री बबनराव घोलप (Shivsena Leader Babanrao Gholap resignation) यांनी रविवारी (दि.१०) नाराजीतून तडकाफडकी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. यासंदर्भात घोलपांनी माध्यमांशी संवाद साधताना, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यासह मंत्री भुजबळांवर गंभीर आरोप केले. दरम्यान, घोलपांच्या राजीनाम्यानंतर खा. संजय राऊत यांनी त्यांना भेटीसाठी मुंबईला बोलावले असून, चर्चेनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे घोलप यांनी सांगितले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केल्याने इच्छुक असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप हे नाराज झाले होते. त्यानंतर संपर्कप्रमुखपदी घोलपांना डावलत त्यांच्या जागेवर विधानपरिषद आमदार सुनील शिंदे यांच्यावर या पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने शनिवारी (दि.9) घोलपांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने राजकीय खळबळ उडाली आहे. खा. हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ अजय बोरस्ते, इ. नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर घोलपांचा राजीनामा ठाकरे गटासाठी मोठा धक्का समजला जात आहे.

- Advertisement -

उपनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी, मी अद्याप शिवसेनेतच आहे. खा. संजय राऊत यांनी मला मुंबईला बोलावले असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलूनच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे घोलप यांनी सांगितले. दरम्यान, शिर्डी लोकसभेसाठी उपनेतेपदाच्या राजीनाम्याचा निर्णय देवळाली विधानसभा मतदारसंघावर होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर माजी मंत्री घोलपांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची सूत्र राहूरी शहराकडे जात असतील आणि बबनराव घोलपांसारख्या एकनिष्ठ नेत्यावर अन्याय होत असेल तर हा षड्यंत्राचा भाग आहे. शिवसैनिकांसाठी मातोश्री दैवत आहेच. मात्र, ग्राऊंड रिपोर्ट मातोश्रीपर्यंत चुकीचा दिला जात असल्यानेच एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होत आहे. : प्रमोद लभडे, जिल्हाप्रमुख, उत्तर अहमदनगर

पक्षाशी एकनिष्ठ असलेले बबनराव घोलप यांनी उपनेतेपदाचा तडकाफडकी राजीनामा देणे योग्य नाही. पक्षीय पातळीवर गैरसमज आणि स्वतःवर अन्याय होत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडणे आवश्यक होते. न्याय मिळाला असता. : दत्ता गायकवाड, सहसंपर्क प्रमुख, नाशिक लोकसभा

घोलप म्हणतात…

  • मी अद्याप शिवसेनेतच. नेते खा. संजय राऊत यांच्याशी चर्चेनंतर, कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका स्पष्ट करणार
  • मिलिंद नार्वेकर यांच्या भूमिकेने एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याने पक्षाला मारक
  • छगन भुजबळांनी षड्यंत्र रचून आमच्यासारख्या शिवसैनिकांवर केसेस दाखल करुन सडविले
  • एक वर्षापूर्वी भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला होता. शिवसेना प्रमुखांवर केसेस केलेल्या भुजबळांच्या प्रवेशाला मी तीव्र विरोध केला.
  • वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक पातळीवर बदल करण्यात आल्यानंतर पक्ष वेठीस धरणार्‍या लोकांनाच प्रमोट केले जाते
  • उद्धव साहेबांच्या अहमदनगर दौर्‍यात नार्वेकरांनी भाऊसाहेब वाकचौरेंना पुढे केल्याचे तेव्हाच माझ्या लक्षात आले होते
  • 55 वर्षांपासून मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे. नाशिक, अहमदनगर व संभाजी नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या शाखा मी उघडल्या आहेत
  • मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. शिवसेना सोडणार नाही. हवे तर त्यांनी आम्हाला पक्षाबाहेर काढावे
  • शिवसेना नेते खा. राऊतांनी भेटीसाठी बोलावले असून त्यांच्या भेटीनंतरच भूमिका स्पष्ट करणार

अहिरराव होणार सक्रीय?

एकिकडे घोलपांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर येताच देवळालीत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक तहसीलदार राजश्री अहिरराव या लवकरच राजीनामा देवून राजकारणात सक्रिय होणार असल्याचे समजते. अहिरराव या नोव्हेंबर महिन्यात राजीनामा देणार असल्याची चर्चा होती.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -