…मग बाळासाहेबांना पद्मविभूषण का नाही? मुलायमसिंह यादवांच्या पुरस्कारावर राऊतांचा आक्षेप

Sanjay Raut on Padma visbhushan | मुलायम सिंह यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. आत त्यांनाच पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला. भाजपा आपल्या विचारात हळूहळू बदल करतेय, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on Padma visbhushan | मुंबई – मुलायम सिंह यादव यांना दिलेल्या पद्मविभूषण सन्मानावर आक्षेप घेत बाळासाहेबांना पुरस्कार का दिला नाही, यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. ज्यांनी कारसेवकांवर गोळीबार केला. ज्यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा आरोप आहे, त्यांनाच पद्मविभूषण दिल्याने त्यावर आमचा आक्षेप आहे, अशा स्पष्ट शब्दांत संजय राऊतांनी पुरस्कारांविरोधात हल्लाबोल केला. आज त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत संवाद साधला.

अयोध्याकांड झालं तेव्हा कारसेवकांवर मुलायमसिंह यांच्या समर्थकांकडून गोळ्या झाडण्यात आल्या. भाजपाने तेव्हा त्यांचा उल्लेख हिंदूंचा हत्यारा असा केला. मुलायम सिंह यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. आत त्यांनाच पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलंय. भाजपा आपल्या विचारात हळूहळू बदल करतेय, असं संजय राऊत म्हणाले.

देशात दोन हिंदूहृदयसम्राट होऊन गेले. एक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. मग पद्मविभूषणसाठी त्यांचा विचार का केला नाही. बाळासाहेबांनी अयोध्या प्रकरणात कडवट भूमिका घेतली. बाबरी पाडल्यानंतर भाजपाने हात वर केले होते, हे आमचं काम नाही, असं सांगितलं होतं. पण बाळासाहेब म्हणाले की ते शिवसैनिक असतील तर आम्हाला त्यांचा गर्व आहे. राजकीय दृष्टीकोन ठेवून मुलायम सिंह यांचा गौरव करता मग वीर सावरकरांचा कधी गौरव करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बाळासाहेबांना पदवी द्या अशी आम्ही कधीही मागणी केली नाही. पण त्यांचा विचार का केला नाही. मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबीयांनीही त्यांचा गौरव करा, अशी मागणी केली नव्हती. तरीही त्यांचा सन्मान झाला, मग बाळासाहेबांचा का विचार झाला नाही, असं संजय राऊत म्हणाले.

तैलचित्र लावून बाळासाहेब ठाकरे आमचेच, त्यांच्या विचारांचे आम्ही वारसरादर अशा पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान सध्याचं सरकार करतंय का हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले.

सामनातूनही फटकार

प्रजासत्ताक दिनी देशातील अनेक प्रतिष्ठित मंडळींना ‘पद्म’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यातील बरीच नावे ही ‘संघ’ परिवाराशी संबंधित आहेत व त्याविषयी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पंतप्रधान मोदी यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणतात, ‘पद्म पुरस्काराने गौरविण्यात आलेल्यांचे देशासाठी योगदान आणि प्रयत्न यामुळे भारत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.’ आता पंतप्रधान मोदी म्हणतात म्हणजे ते खरेच असणार. झाकीर हुसेन, सुमन कल्याणपूर, भैरप्पा, सुधा मूर्ती, कुमारमंगलम् बिर्ला अशांचा गौरव झाला तो योग्यच आहे. नेहमीप्रमाणे काहींना मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाले. त्यात डॉ. दिलीप महालनोबीस, कर्नाटकचे काँग्रेस नेते एस. एम. कृष्णा, बालकृष्ण दोशी व मुलायमसिंग यादव यांचा समावेश आहे. एस. एम. कृष्णा हे कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकातील ‘वोक्कालिगा’ समाजावर प्रभाव टाकण्यासाठी कृष्णा यांचा गौरव केला गेला, असे सांगितले जाते. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यासाठी हा खटाटोप असला तरी कृष्णा यांच्यासारख्यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल जिवंतपणी पुरस्कार का दिला जात नाही? हा प्रश्नच आहे. दिवंगत मुलायमसिंग यादव यांनाही पद्मविभूषण सन्मान देण्यात आला. हे आक्रितच म्हणावे लागेल. जिवंतपणी करसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना करणाऱ्या भाजप सरकारला मुलायम यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची गरज भासली हे महत्त्वाचे.