चालू वर्षांत पोलिसांच्या बढत्या,बदल्या नाहीत

mumbai police
प्रातिनिधिक छायाचित्र

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्य पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा चालू वर्षांत बढत्या आणि बदल्याचे आदेश निघणार नाही, अलीकडेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांना दिली आहे. त्यामुळे बढती आणि बदल्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

मुंबईसह महाराष्ट्र राज्यात सध्या करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची एक तातडीची बैठक झाली होती. या बैठकीत करोनासंदर्भात करण्यात आलेल्या विविध विभागांतर्गतच्या उपाययोजनांत सातत्य राखणे गरजेचे आहे असे नमूद करण्यात आले. त्यामुळे चालू वर्षांत कोणत्याही संवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी यांची बदली करण्यात येऊ नये, तसा आदेशच सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आला आहे. त्यामुळे गृहविभागाने चालू वर्षांत कोणत्याही संवर्गातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बढती आणि बदली न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत हा आदेश जारी राहणार आहे. सर्वसाधारणपणे मे महिन्यात मुंबईसह राज्य पोलीस दलात जनरल ट्रॉन्स्फर होत असते, मात्र यंदा ही ट्रान्स्फर करोनामुळे झाली नव्हती

येत्या एक-दोन महिन्यात ट्रान्स्फरचे आदेश निघतील असे वाटत असतानाच अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांच्या परिपत्रकामुळे आता बदली आणि बढत्याच्या प्रतिक्षेत असलेल्या पोलिसांची निराशा झाली आहे. संबंधित आदेशाचे एक प्रत सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक, राज्य राखीव दल पोलीस बल (रेल्वे), पोलीस महासंचालक-लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अतिरिक्त पोलीस महासंचालक-वाहतूक, प्रशिक्षण व खास पथके, पुणे गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवाद विरोधी पथक, सर्व विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान विभागाला पाठविण्यात आली आहे.