घरमहाराष्ट्रराज्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीची नांदी, 'सामना'तून सुतोवाच

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीची नांदी, ‘सामना’तून सुतोवाच

Subscribe

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलेच जवळ आले आहेत. याचं रुपांतर युतीमध्ये होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. दरम्यान, आता शिवसेनेने ‘सामना’तून राष्ट्रवादी-सेना युतीच्या नांदीचे सुतोवाच दिले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला एकत्र यावं लागेल, असं शिवसेनेने सामनामध्ये म्हटलं आहे.

“स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे,” असं सामानमध्ये म्हटलं आहे. “महाराष्ट्रात आधीच स्वबळाचे अजीर्ण झाले आहे. त्यात आणखी भर नको. महाराष्ट्रात रोज एक नवी समस्या उभी राहत आहे. राज्य अस्थिर व्हावे, आर्थिकदृष्टय़ा कमजोर पडावे यासाठी राजकारणातील काही दुष्ट शक्ती टपून बसल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे अजीर्ण झाले की ते वाईटच,” अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

“महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्त्वाचा घटक आहे, पण महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आज तिसऱया स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोलेंनी पक्षातील कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण केला. नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा करताच भाजपचे तालेवार नेते रावसाहेब दानवे यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याची चावी फिरवली. दानवे यांचे म्हणणे आहे की, पुन्हा शिवसेना – भाजप युती शक्यच नाही. त्यामुळे स्वबळावरच लढावे लागेल. भाजपच्या जवळ जाईल व एकत्र लढतील असा पक्ष महाराष्ट्रात दिसत नाही. त्यामुळे भाजपास स्वबळावर लढणे अपरिहार्य आहे. दानवे यांनी तेच सत्य मांडले. स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल,” असं शिवसेनेने सामानामध्ये म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -