पुणे : अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रसेच्या (NCP) 8 आमदारांनी 2 जुलै 2023 रोजी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीमंडळाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे. याशिवाय बंडखोरीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चार ते पाच वेळा भेट झाली आहे. या दोघांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्येही बिनसल्याचं चित्र आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक मोठे वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडली नसून अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. (There is no division in NCP Ajit Pawar of our party A big statement by Supriya Sule)
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या निर्णयाबद्दल आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यावर लवकरच निकाल येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करत आहोत. आमच्या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
हेही वाचा –Maharashtra News : शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
अजित पवारांबाबत मोठे विधान
अजित पवारांबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी आता पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष काय निकाल देणार याची आम्ही वाट पाहत आहोत, असेही त्या म्हणाल्या.
चोरडीयांच्या घरी आम्ही आजही जाऊ
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचा वेगळा गट झालेला असतानाही ते शरद पवार यांच्यासोबत चोरडीयांच्या घरी एकत्र बैठकीला भेटतात. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी या भेटीवर आपली भूमिका मांडताना म्हटले की, चोरडीया आणि पवार कुटुंबीयांचे आमच्या जन्माच्या आधीपासून संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी आम्हाला भेटायला बोलावले तर, आम्ही आजही जाऊ, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – राज्य सरकार आता गप्प का? कांदा लिलावावरून रोहित पवार यांचा सवाल
पक्ष फुटीनंतर सुप्रिया सुळेंचे विधान महत्त्वाचे
दरम्यान, अजित पवार यांनी 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली आणि ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतरअजित पवार यांनी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीचे आव्हान पेलत महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली. असे असले तरी अजित पवार आणि शरद पवार यांनी चार ते पाच वेळा भेट घेतली आहे. मात्र शरद पवारांनी प्रत्येक वेळी याला कौटुंबिक बैठक म्हटले आहे. ही सर्व राजकीय परिस्थीती असताना सुप्रिया सुळे यांनी आज केलेले विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.