घरCORONA UPDATEरेमडेसिवीर प्रभावी ठरत असल्याचा पुरावाच नाही

रेमडेसिवीर प्रभावी ठरत असल्याचा पुरावाच नाही

Subscribe

गेल्या आठवड्यात ज्या इंजेक्शनसाठी आंदोलन झाले, मेडिकल्सबाहेर रांगा लागल्या ते रेमडिसिवीर कोरोना संसर्गावर प्रभावी ठरत असल्याचा कोणताही पुरावा पुढे आलेला नाही. खुद्ध जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील ही बाब स्पष्ट केली आहे. २००३ सालात जेव्हा सार्सचा (सिविअर अॅक्युट रिस्पायरेटरी सिण्ड्रोम) संसर्ग सुरू झाला होता, तेव्हा त्यावर निर्बंधांसाठी रेमडेसिवीरची निर्मिती झाली होती. त्यामुळे हे इंजेक्शन गेल्या वर्षी आलेल्या कोरोनावर प्रभावी आहे, असे कसे म्हणता येईल? आजच्या या भागात हे इंजेक्शन कुणाला, कोणत्या अवस्थेत दिले जावे, त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेणार आहोत.

कोरोना संसर्गामुळे हॉस्पिटल्समध्ये दाखल असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळवून देण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी अक्षरशः अस्वस्थ झालेले आहेत. काही हॉस्पिटल्सच्या आग्रहामुळे हे इंजेक्शन्स संजीवनी असल्याचा समज निर्माण झाला आहे. म्हणूनच बाराशे रुपये किंमतीचे रेमडेसिवीर आधी ४ हजार, नंतर १२ हजार आणि दोन दिवसांपूर्वी तब्बल ४० हजारांपर्यंत विकले गेले. केवळ हतबलता आणि कठीण काळ यामुळे नागरिकांनीही जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या किंमतीत हे इंजेक्शन्स विकत घेतले. याचा खरोखर कितपत प्रभाव झाला, हे इंजेक्शन दिलेच नसते तर काय झाले असते, या इंजेक्शनला दुसरा पर्याय काय, असे प्रश्नही कुणी विचारण्याचे धाडस केले नाही. अर्थात, परिस्थितीपुढे माणूस कसा हतबल होतो, हे गेल्या आठवड्यात नाशिककरांनी अनुभवले.

रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना संसर्ग झाल्यानंतर नेमक्या कोणत्या स्टेजमध्ये वापरावे, याचे एक सूत्र टास्क फोर्सने आखून दिले आहे आणि ते त्याच पद्धतीने वापरावे, असे वारंवार आवाहनही टास्क फोर्सकडून केले जाते आहे. प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे आहे. रेमडेसिवीरचा अचूक वेळी अचूक मात्रेत उपयोग केलाच तर दोन-तीन दिवस आधी डिस्चार्ज होऊन रुग्णाला घरी जाता येईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रेमडेसिवीर हे कोरोना संसर्ग झाल्यापासून ९ दिवसांच्या आत दिले तरच त्याचा अधिक परिणाम होतो, असे टास्क फोर्सचे म्हणणे आहे.

- Advertisement -

या अवस्थेत इंजेक्शन देणे अपेक्षित

नवीन नियमावलीनुसार स्टेज ई आणि स्टेज एफ अर्थात जेव्हा कोरोनाबाधिताला ऑक्सिजनची आवश्यकता भासते किंवा त्याला ऑक्सिजनसाठी कृत्रिम व्हेंटिलेटर किंवा बायपॅपचा वापर करावा लागतो, अशा रुग्णांसाठी हे इंजेक्शन उपयुक्त ठरते. महत्वाची बाब म्हणजे हे इंजेक्शन दिल्यास रुग्णाचा जीव वाचतो, असे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या कोणत्याही सरसकट परीक्षणात दिसून आलेले नाही.

ऑक्सिजनएवढाच आत्मविश्वास महत्त्वाचा

प्रत्येकाच्या मनात कोरोनाची एवढी दहशत निर्माण झाली आहे की, अनेक महाभाग लक्षणे दिसत असतानाही केवळ कोरोनाच्या भीतीने चाचणी करण्यास टाळाटाळ करतात. आजवर अनेकांचा मृत्यू हा केवळ भीतीने झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या आजारात ऑक्सिजनएवढेच महत्त्व आत्मविश्वासाला दिले जाते. कुठेही स्वतःला खचू न देणे हीच खरी संजीवनी ठरत असल्याचे रुग्णांच्या अनुभवातून दिसून आले आहे. औषधे ही केवळ संसर्ग कमी करण्यास मदत करतात, मात्र जगण्याची उमेद आणि ऊर्जा ही स्वतःच्या आत्मविश्वासातून निर्माण होत असते.

- Advertisement -

किंमतीवर नियंत्रण आणावे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीरची मूळ किंमत केवळ आठशे रुपये असल्याचे सांगितले होते. तसे असेल तर राज्य सरकारने या इंजेक्शनची सर्वसमावेशक किंमत निश्चित करुन सर्व कंपन्यांना ती बंधनकारक करावी. जेणेकरुन कंपनीनुसार या इंजेक्शन्सच्या किंमती वेगवेगळ्या राहणार नाहीत. कोरोनासारख्या संकटकाळात या इंजेक्शन्सचा वापर हा लाखोंच्या प्रमाणात होत असतानाही, किंमत आणि साठ्याबाबतची सरकारची भूमिका अनाकलनिय आहे.

म्हणून उपचार काही थांबत नाहीत

कोणत्याही आजारात एखादे ठराविक औषध किंवा इंजेक्शन उपलब्ध झाले नाही तरीही त्यावरील उपचार कधी थांबत नाहीत. कोरोनादेखील त्याला अपवाद नाही. रेमडेसिवीर मिळाले नाही म्हणजे उपचार थांबले, असे कुणी समजू नये. कारण, अन्य अँटी बायोटिक्स, अँटी फ्लू औषधे आणि महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजनदेखील यात उपयुक्त ठरतो. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जी औषधे उपलब्ध आहेत, त्यापैकी रेमडेसिवीर हे एक आहे, एवढेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन डॉ. समीर चंद्रात्रे यांनी केले आहे.

रेमडेसिवीर नाही म्हणजे रुग्ण वाचणार नाही, अशा अफवा कृपया कुणी पसरवू नये. हे इंजेक्शन कोरोनावरचा ठोस उपाय नाही. केवळ पूरक औषध म्हणून त्याकडे पाहिले जावे. याच्या किंमती नियंत्रणासाठी राज्य सरकारनेही तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे.
– डॉ. समीर चंद्रात्रे, सहसचिव, आयएमए, महाराष्ट्र

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -