घरमहाराष्ट्रराज्यात मध्यावधी निवडणुकांची स्थिती नाही!

राज्यात मध्यावधी निवडणुकांची स्थिती नाही!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा निर्वाळा

मुंबई – उद्धव ठाकरे यांनी कशाच्या आधारे वक्तव्य केले हे मी जाणून घेतलेले नाही, पण राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका आता लागतील असे मला वाटत नाही. मला तरी आता तशी स्थिती आहे असे वाटत नाही, असा निर्वाळा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळून लावली.

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचाराच्या ऑनलाईन भाषणादरम्यान राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागतील, अशी शक्यता व्यक्त केली होती. शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ते जर उडाले तर आपल्या राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शरद पवार यांनी विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांची शक्यता निकाली काढली.

- Advertisement -

मतदार कुठे गेले असतील तर त्यांनी निवडणुकीसाठी यावे, असे आवाहन करण्यात चुकीचे नाही. जर मतदार नसेल तर त्यासंबंधी हरकत घेणे योग्य आहे. एखाद्याच्या भाषणावर हरकत घेणे म्हणजे कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीकाही पवार यांनी भाजपवर पोटनिवडणूक प्रचारावरून केली. कसब्यामध्ये मिळालेली माहिती जरी अधिकृत नसली तरी या पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून जे अर्थकारण होत आहे, ते यापूर्वी कधी बघितले नाही असे लोक सांगतात, असे पवार म्हणाले.

मी मजेत बोललो होतो

- Advertisement -

यावेळी शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवरील विधानावरून घूमजाव केले. राष्ट्रपती राजवट हटली, त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हे मी मजेत बोललो होतो. फडणवीस यांनी माहिती द्यावी. त्याला मी इतके महत्त्व देत नाही. शरद पवारांच्या बोलण्यामुळे राष्ट्रपती राजवट हटते इतके माझे महत्त्व आहे, चांगले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

मला काय म्हातारा समजता; पवारांनी घेतली परीक्षार्थींची फिरकी

दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांची भेट घेऊन आयोगाच्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले. आपण रात्री ११ वाजता आम्हाला भेटलात. या वयातही आपण तब्बल ४० मिनिटे उभे होतात. आमच्या व्यथा जाणून घेतल्या. इतर पुढारी पुण्यातील कसब्यात प्रचाराला आले आणि तिथून आमच्याकडे आले. आपण एकमेव होतात ज्यांनी फक्त आमच्यासाठी वेळ दिला. आपले खरोखर आभार, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. त्यावेळी पवार यांनी माझी तुम्हा सगळ्यांकडे एक तक्रार आहे. या वयातही, असे पुन्हा पुन्हा म्हणता. आपण मला काय म्हातारा समजता का, अशी मिश्कील टिप्पणी पवारांनी केल्याने एकच हास्यकल्लोळ उडाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -