आमच्या सरकारमध्ये कोणीही सुपर सीएम नाही – फडणवीस

कोणत्याही सरकारमध्ये सुपर सीएम नसतो,आमच्याकडेही नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आणि आमचे नेते आहेत.काहींना हे बघवत नाही म्हणून ते टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Devendra Fadnavis

कोणत्याही सरकारमध्ये सुपर सीएम नसतो,आमच्याकडेही नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आणि आमचे नेते आहेत.काहींना हे बघवत नाही म्हणून ते टीका करत आहेत, असे जोरदार प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.ओबीसी आरक्षण ज्यांना नकोय तेच सध्या टीका करत आहेत.औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला कोणतीही स्थगिती नाही. आधीच्या सरकारने नामांतर अवैधरित्या केले होते. आता आमचे पूर्ण बहुमत असणारे सरकार ते वैधरित्या करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी देवेंद्र फडणवीस हेच सरकार चालवत असल्याची टीका विरोधी पक्षाकडून होत आहे.विधिमंडळातील पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शिंदे यांच्यासमोरील माईक खेचून घेतला.मंत्रीमंडळ बैठकीनंतरच्या पत्रकारपरिषदेत फडणवीस यांनी शिंदे यांच्याकडे चिट्ठी सरकारवली अशा बातम्या वृत्तवाहिन्यांनी दाखवल्या. याविषयी आज पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले,सध्या पत्रकारांकडे बातम्या कमी पडत असाव्यात म्हणून अशा बातम्या येतात.तसेच सकाळी ९ वाजता कोणी बोलले की त्याचा प्रतिध्वनी ११ वाजता दुसरीकडे उमटत असतो.त्याचाच परिणाम म्हणून मी माईक खेचला,चिठठी दिली अशा बातम्या येतात.खरे तर त्यावेळी पत्रकारानेच हा प्रश्न शिंदेंना नाही तर मला विचारला होता म्हणून तो माईक मी घेतला.मात्र तो प्रश्न म्यूट करून बातम्या चालविल्या.तसेच मुख्यमंत्र्यांना चिट्ठी देण्यात गैर काय?आमच्या सरकारमध्ये कोणीही सुपर सीएम नाही.एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि ते आमचे नेते आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

ओबीसी आरक्षण ज्यांना नको आहे तेच सध्या टीका करत आहेत.बांठिया आयोगाने २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला आहे.तो अहवाल न्यायालयातही सादर झाला आहे.मला आश्चर्य वाटते की ज्यांच्या काळात हा आयोग गठित झाला तेच आता टीका करत आहेत.अंतिम टक्केवारीबाबत कोणाचे मतमतांतर असू शकते.पण हा आयोग केवळ राजकीय आरक्षणासाठी आहे.त्यामुळे या संदर्भात जर अधिकचा अभ्यास करायचा असेल तर त्याला आमच्या सरकारची तयारी असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.