घरमहाराष्ट्रआयआयटीमधील दलित विद्यार्थी आत्महत्येची सखोल चौकशी करावी - रामदास आठवले

आयआयटीमधील दलित विद्यार्थी आत्महत्येची सखोल चौकशी करावी – रामदास आठवले

Subscribe

मुंबई : गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे पवईस्थित आयआयटीमधील दलित विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच पुन्हा कोणताही विद्यार्थी आत्महत्या करणार नाही, याची आयआयटी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

पवई येथील आयआयटीला रामदास आठवले यांनी आज, बुधवारी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, रिपाइंचे स्थानिक ज्येष्ठ नेते बाळ गरुड; सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यवंशी; आयआयटीचे विविध अधिकारी उपस्थित होते. आत्महत्या करणारा विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या कुटुंबीयांना आयआयटीने सांत्वनपर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.

- Advertisement -

यापूर्वी 2014मध्ये अनिकेते अंभोरे या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. आता दर्शन सोळंकी या 18 वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तो अहमदाबादचा रहिवासी होता आणि आयआयटी मुंबईमध्ये बी.टेक (केमिकल) प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. याबाबत रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार थांबविण्यासाठी आयआयटी प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे, अशी सूचना आठवले यांनी केली.

उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार
दर्शन सोळंकी यांचे त्यांच्या वडिलांशी बोलणे झाले होते. त्याला एका विषयाचा पेपर कठीण गेला होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी दर्शनला खंबीर राहण्याचा सल्ला दिला. तसेच, पुन्हा गावी अहमदाबादमध्ये जाऊ, मी येत आहे, असा निरोप दिला होता. मात्र तरीही लगेच दर्शन सोळंकीने आत्महत्या केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून यात जातीवाद आहे का? की अन्य कारण आहे? याचा शोध पोलीस यंत्रणेने घेतला पाहिजे. त्यासाठी आपण उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी समिती नेमून दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

- Advertisement -

आयआयटी प्रशासनाचा खुलासा
ग्रामीण भागातून दलित मागासवर्गीय गरीब विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश घेतात. त्यांची इंग्रजी भाषेवर पकड मजबूत करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आयआयटीमध्ये विशेष प्रशिक्षण वर्ग घेतला जातो. आयआयटी, पवईमध्ये 2 हजार अनुसूचित जाती-जमातीचे विद्यार्थी शिकत आहेत. त्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयआयटी पवईत एससी – एसटी फोरम स्थापन केलेला आहे, अशी माहिती आयआयटी प्रशासनाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -