घरमहाराष्ट्रखासदार शेवाळेंची 'एनआयए' चौकशी व्हायला हवी, ठाकरे गटाची भूमिका

खासदार शेवाळेंची ‘एनआयए’ चौकशी व्हायला हवी, ठाकरे गटाची भूमिका

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर दाऊदसंबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप ईडी-एनआयएने ठेवला व त्यांना अटक केली. त्यापेक्षा गंभीर प्रकरण संसदेचे सदस्य राहुल शेवाळे यांचे दिसते. फुटीर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून व खासकरून ‘एनआयए’कडून तत्काळ चौकशी व्हायला हवी. एका महिलेचे प्रकरण शेवाळे यांच्या अंगावर शेकले आहे व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा मामला आहे, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आहे.

दाऊद इब्राहिम, पाकिस्तान, आयएसआयशी संबंधित महिलेशी या खासदारांचे संबंध होते व ते संबंध सरळमार्गी नव्हते. संबंधित महिलेसोबत संसद सदस्याचे जे व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध झाले आहेत ते गंभीर तसेच अनैतिक आहेत. या महिलेशी संबंधित खासदारांचे अत्यंत प्रेमाचेच संबंध होते व या महिलेस लग्नाचे वगैरे वचन देऊन खासदारांनी नाते घट्ट केले. हे नाते घट्ट होते तोपर्यंत दाऊद, पाकिस्तानशी संबंध असल्याचा साक्षात्कार खासदार शेवाळे यांना झाला नाही, याबाबत ठाकरे गटाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

- Advertisement -

…तर हा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायला हवा
पाकिस्तान आले की, आयएसआयचे जाळे आले व आपल्या देशातील राजकारण्यांना अशा जाळ्यात अडकवले जाते. खासदार शेवाळे हे त्या आयएसआयच्या जाळ्यात होते काय व त्यांनी दुबई, तसेच दुबईमार्गे अन्य कोठे प्रवास केला काय? ते कोणाला भेटले व त्यांच्याबरोबर अन्य काही खासदार होते काय? या खासदारांकडून राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात गोपनीय माहिती पाकिस्तानपर्यंत गेली तर नाही ना, याची चौकशी एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने करायला हवी. पुन्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेने चालढकल केलीच तर हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या टेबलावर नेला पाहिजे, असे ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

खासदार शेवाळेंची पश्चातबुद्धी
संबंधित महिला आपल्याला आता ब्लॅकमेल करते व मी तिची तक्रार केली असल्याचे खासदारांनी सांगणे हा खोटारडेपणा आहे. मुळात अशा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संशयास्पद असलेल्या महिलेच्या प्रेमात खासदार अडकले. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती या खासदाराने त्या महिलेला पुरवली काय? हनी ट्रपमध्ये खासदार अडकले आहेत व संबंधित महिलेच्या विरोधात आपण कोठे व कशा तक्रारी केल्या याबाबत त्यांनी खुलासे द्यायला सुरुवात केली आहे, पण ही सर्व पश्चातबुद्धी आहे, असे या ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

कबुतरबाजीत शेवाळे अडकले
खासदार शेवाळे हे नक्कीच शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले व आता हिंदुत्व, नैतिकता, राष्ट्राभिमान अशा मुद्द्यांवर त्यांनी शिंदे यांच्या खोके गटात प्रवेश केला, पण पहिल्या चार महिन्यांतच शेवाळे व इतरांचा नैतिकतेचा मुखवटा गळून पडला आहे. दिल्लीच्या भाषेत ज्यास ‘कबुतरबाजी’ म्हटले जाते अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला. हे गंभीर आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

अन्य काही खासदारांबद्दलही संशय
या कबुतरबाजीने देशाच्या सुरक्षेस सुरुंग लागला आहे. या सुरुंगाची दारू संसदेच्या सभागृहात पोहोचली असेल तर गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांना कठोर पावले उचलावी लागतील. खासदार शेवाळे यांचे कबुतरबाजीचे प्रकरण ‘अंडरवर्ल्ड’शीही संबंधित आहे. ’26/11’चा हल्ला आपल्याकडील घरभेद्यांमुळेच झाला. त्याआधीच्या बॉम्बस्फोट मालिकांत दाऊदचे हस्तक सहभागी होते, पण तेथेही आयएसआयने फितुरीचे बीज रोवले होते. आता शेवाळे प्रकरणात फितुरी, हेरगिरीचा संदर्भ आहे व त्याचा खुलासा स्वतः शेवाळे यांनीच केल्यामुळे तपास यंत्रणांचे काम सोपे झाले. या कबुतरबाजीत खासदार शेवाळे एकटे नाहीत व त्यांच्यासोबत आणखी काही खासदार असावेत, अशी माहिती समोर येत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

शिवसेनेचा संबंध नाही
शेवाळे यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक व राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे हे कारस्थान आहे व त्यामागे शिवसेनेचे लोक आहेत. शेवाळे यांचा हा दावा खरा नाही. संबंधित महिलेसोबतचे जे चित्रण प्रसिद्ध झाले त्याचे चित्रीकरण विविध ठिकाणी याच प्रेमी युगुलाने केले आहे. येथे शिवसेनेचा प्रश्न येतोच कोठे? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

खासदार राहुल शेवाळेंना क्लीनचिट?
पुन्हा या महिलेचा दाऊद व पाकिस्तानशी संबंध असल्याची माहितीही स्वतः खासदार महोदयच देत आहेत. आता काय करायचे? आता प्रश्न या महिलेच्या सुरक्षेचा निर्माण होतो. एकतर या महिलेस महाराष्ट्राचे पोलीस अटक करतील व तिचे तोंड कायमचे बंद केले जाईल किंवा अन्य काही घडवले जाईल व शेवटी या प्रकरणातही खासदार शेवाळे यांना क्लीनचिट देण्याचाच प्रयत्न होईल, अशी शक्यताही या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.

एनआयएकडून अपेक्षा
या प्रकरणात शेवाळे यांच्यासोबत इतर खासदारांचीही नावे येऊ शकतात व संबंधित महिला चौकशीत अन्य धक्कादायक खुलासे करण्याची भीती वाटते. पंतप्रधान मोदी यांनी नवे संसद भवन दिल्लीत उभारले. त्या वास्तूस पाकिस्तान, आयएसआयशी संबंध ठेवणाऱ्या खासदारांचे पाय लागू नयेत. बाकी राष्ट्रीय तपास यंत्रणेत देशभावना जागरूक असेल तर महाराष्ट्रातील खासदारांच्या कबुतरबाजीचे प्रकरण खणून काढील व ती कोणाचीही गय करणार नाही, अशी अपेक्षा ठाकरे गटाने व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -