उठाव आणि बंड नव्हताच, ती गद्दारीच होती, गद्दार म्हणूनच माथ्यावर शिक्का घेऊन फिरणार, आदित्यचा घणाघात

सुरतेला पळून गेले नसते. बंड करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंसमोर येऊन सांगण्याची हिंमत झाली नाही. जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधलाय

Aditya Thackeray

ठाणेः ते सांगतात आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला. उठाव आणि बंड हा मुळातच नव्हता, ही गद्दारी होती आणि गद्दार म्हणूनच ते माथ्यावर शिक्का घेऊन फिरणार आहेत. बंड करायला आणि उठाव करायला हिंमत लागते, ताकद लागते, असा टोला युवासेना नेते आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना लगावलाय. आदित्य ठाकरेंनी आज ठाण्यात शिवसंवाद यात्रा काढलीय, त्यावेळी ते बोलत होते.

ते सांगतात आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला. उठाव आणि बंड हा मुळातच नव्हता, ही गद्दारी होती आणि गद्दार म्हणूनच ते माथ्यावर शिक्का घेऊन फिरणार आहेत. बंड करायला आणि उठाव करायला हिंमत लागते, ताकद लागते. ठाण्यातही आल्यानंतर सगळे आम्हाला येऊन भेटत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत आम्ही आहोत, कारण उद्धव ठाकरे सच्चा माणूस आहे. बंड करायचा असता तर गुवाहाटीला पळून गेले नसते, तिकडच्या तिकडे उभे राहिले असते. सुरतेला पळून गेले नसते. बंड करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंसमोर येऊन सांगण्याची हिंमत झाली नाही. जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधलाय.

ते पुढे म्हणाले, शिवसैनिकांवर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर विश्वास ठेवायचा. स्वतःच्या आमदार आणि खासदारांवर आम्ही लक्ष ठेवलं नाही. जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, आमदार, खासदारांवर अंधविश्वास ठेवला. तुमच्यात लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा, जे काही असेल ते जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.


ज्यांना परत यायचं असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे 24 तास खुले आहेत. जे चाललंय ते बरं नाही. आता दोन लोकांचं मंत्रिमंडळ आहेत. हे जे सरकार झालेलं आहे ते घटनाबाह्य झालेलं आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणार आहे हे लिहून घ्या. चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं. उठाव नव्हे तर ही गद्दारीच आहे. उद्धव ठाकरे भेटत नव्हते कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती. उद्धव ठाकरे आजारी असतानाच बंडाची तयारी सुरू केली होती. त्यांना वाटलं आता उद्धव ठाकरे परत उठणार नाहीत, पण उद्धव ठाकरे आजारी असतानाही मंत्रिमंडळाच्या बैठका घेत होते. बेडवरूनही ते काम करत होते, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलंय.

20 जूनपासून काल 20 जुलैपर्यंत महाराष्ट्रात वेगळे वातावरण होतं. दुःखदायक वातावरण होतं. स्वतःचं दुःख विसरून जायला मी शिवसंवाद दौरा घेतलेला आहे. जे काही चित्र दिसतंय ते क्लेशदायक आहे. अतिशय दुःखदायक होतं. ज्यांना ज्यांना आपण स्वतःहून ओळखलं, पुढे आणलं. त्यांची ओळख दिली, तिकिटं दिली, मंत्रिपदं दिली. जे जे करू शकलो ते केलं, त्यानंतर ते आपल्याला धोका देऊन सोडून गेले, आपल्याशी गद्दारी करून सोडून गेले हे तुम्हाला तरी पटणारं आहे का?, महाराष्ट्रात जी सर्कस सुरू आहे हे राजकारण म्हणून तुम्हाला पटणारं आहे का? मी लहान असल्यापासून त्यांना बघत आहे, त्या चेहऱ्यांची मी वाट पाहत होतो. स्वतःचा परिवार म्हणून त्यांना सोबत बघितलेलं आहे. कधीही घरी यायचे, हक्काने बसायचे, काय असेल ते हक्काने मागायचे. आम्हाला हे करा ते करा सांगायचे. हे सगळं घडत असताना नेमकं असं घडलं काय आणि बिघडलं काय की यांना आपल्या पाठीत खंजिर खुपसावासा वाटला. कुठेही आपली शिवसेना हललेली नाही, ज्यांना खाऊन खाऊन अपचन झालं ते हलल्याचा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावलाय.


हेही वाचाः द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, कोण होणार भारताचे नवे राष्ट्रपती? आज निकाल होईल जाहीर