Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी गंगाद्वार येथे दरड कोसळली, जीवितहानी नाही

गंगाद्वार येथे दरड कोसळली, जीवितहानी नाही

Related Story

- Advertisement -

ब्रह्मगिरीचा भाग असलेल्या गंगाद्वार येथे डोंगरमाथ्यावरून दरड कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने गंगाद्वारजवळील कठड्यांची हानी झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक डोंगरमाथ्यावरून दरड कोसळल्याने गंगाद्वारजवळील कठड्यांची हानी झाली. सध्या ब्रह्मगिरीच्या अवैध उत्खनननाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. दरम्यान, रायगड जिल्ह्यात घडलेल्या दरड दुर्घटनेनंतर ब्रह्मगिरीच्या अवैध उत्खननामुळे अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोकाही पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या गावांनाही धोका निर्माण झाला असून या गावकर्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत येथील अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी केली. दोन महिन्यांपूर्वीदेखील येथे दरड कोसळण्याची घटना घडली होती. एका खासगी विकसकाने ब्रह्मगिरीला सुरूंग लावल्याने पावसाला सुरुवात होताच त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वीच गंगाद्वार येथे असलेल्या मंदिराच्या वरच्या बाजूने दरड कोसळल्याने एका मोठ्या दगडाने तीर्थकुंडास हानी पोहचवली आहे. तसेच काही लहान वृक्षदेखील खाली आले . यापूर्वी काही वेळेस माकडांच्या हालचालींनी डोंगरच्या मोकळे झालेले पोपडे पडत असत. काही वर्षांपूर्वी एका भाविकाच्या डोक्यात असाच दगडाचा लहान खडा पडल्याने, त्यास इजा झाली होती. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात दगड पडत नव्हते.

- Advertisement -