बैलगाडा शर्यत होणार, न्यायलयाच्या ‘या’ आहेत अटी; अमोल कोल्हेंनी केले ट्वीट

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिलेली असली तरी काही नियम आणि अटी या घालून देण्यात आलेल्या आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत दिली आहे.

'These' are the court's terms for the bullock cart race; Amol Kolhe tweeted

गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असलेला बैलगाडा शर्यतींबाबतचा निकाल काल गुरुवारी (ता. 19 मे) अखेरीस मार्गी लागला. सुप्रीम कोर्टाने याबाबतचा सर्वोच्च निकाल देत बैलगाडा शर्यतीतील सर्व अडथळे दूर केले. ज्यानंतर महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि कर्नाटका राज्यातही जल्लोष करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिलेली असली तरी काही नियम आणि अटी या घालून देण्यात आलेल्या आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत दिली आहे. (‘These’ are the court’s terms for the bullock cart race; Amol Kolhe tweeted)

खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा हा लोकसभेतही मांडला होता. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी याबाबत आग्रही भूमिका घेतली होती. सुप्रीम कोर्टाने शर्यतीला परवानगी दिल्यानंतर अमोल कोल्हे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “सर्व बैलगाडा मालक आपल्या बैलांना पोटच्या लेकरांप्रमाणे जीव लावतात, याबाबत दुमत नाहीच! सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या शर्ती व अटी आपल्या सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे, त्यामुळे हे सर्व बैलगाडा शौकीन व शर्यतींचे आयोजन करणाऱ्या मंडळींपर्यंत पोहोचवावे, ही नम्र विनंती!
#Bailgada”

बैलगाडा शर्यतीसाठीचे नियम
– एक हजार मीटरपेक्षा अधिक लांबीचे धावण्याचे अंतर नसावे.
– बैलांना किंवा वळूना धावपट्टीवर आणण्यापूर्वी किमान २० मिनिटे आराम द्यावा.
– एका गाडीवानास बैलगाडी चालविण्यास परवानगी असेल.
– बैलास काठीने मारणे अथवा पायाने मारणे अथवा चाबूक अथवा तत्सम उपकरणे अथवा अन्य साधनांचा वापर करण्यास प्रतिबंध असेल.
– शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलांच्या अथवा वळूच्या जोड्या वय, वजन, स्वास्थ आदीनुसार सुसंगत असाव्यात.
– शर्यतीकरिता वळू अथवा बैलांना इतर कोणत्याही प्रकारच्या प्राण्यासोबत जुंपण्यास प्रतिबंध असेल.
– वळू अथवा बैलांसाठी असलेल्या आरामाच्या जागेत पुरेसा आश्रय/निवारा, पुरेसे खाद्य, चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध असावे.
– आरामाची जागा नीटनेटकी, स्वच्छ व आरोग्यदायी असावी.
– नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यवसायाची सेवा किंवा पशुरुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध ठेवावी.
– बैलांना कोणतीही वेदना किंवा यातना दिली जाणार नाही, याची खात्री करावी.
– प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा सोसायटी बैलगाडी शर्यतीच्या आयोजनावर देखरेख ठेवील आणि शर्यत शर्तीनुसार आयोजित केली असल्याची खात्री करील.
– शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या नावांचा अभिलेख, प्राण्यांचे स्वास्थ-नि-आरोग्यविषयक प्रमाणपत्र व शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्यांचा इतर तपशील ठेवावा.
– शर्यतीपूर्वी बैलांचे आरोग्यविषयक प्रमाणपत्र नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावे. प्रमाणपत्राची वैधता शर्यतीच्या दिवसासह ४८ तास इतकी असेल.
– शर्यतीप्रसंगी उत्तेजक द्रव्य, मादक पदार्थ, हानिकारक पदार्थ, इत्यादी, बैलांना दिले नसल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी करील.
– बैलांना थकवा, निर्जलीकरण, अस्वस्थपणा इत्यादी लक्षणे आढळून आल्यास शर्यतीमध्ये भाग घेता येणार नाही.

कोर्टाच्या परवानगीनंतर रंगली श्रेयवादाची लढाई
सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा केल्यानंतर राज्यातील काही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. यामध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश लांडगे, राहुल कुल यांच्या नावाचे पोस्टर लागलेले पाहायला मिळाले.