घर महाराष्ट्र देशाची संपत्ती विकून देश चालवत आहेत, नाना पटोले यांची मोदी सरकारवर टीका

देशाची संपत्ती विकून देश चालवत आहेत, नाना पटोले यांची मोदी सरकारवर टीका

Subscribe

मुंबई : देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, अनेकांनी बलिदान दिले, त्याग केला. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे; पण ज्या लोकांचा या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता, तेच आज सत्तेवर आहेत. खोटे बोलून सत्तेत आले व मागील नऊ वर्षांपासून देशाची संपत्ती विकून देश चालवत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला, प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी ध्वजारोहण करून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पूर्वसंध्येला काही लोकांनी काळा दिवस पाळला, या लोकांची विचारधारा पहा. या लोकांचे स्वातंत्र्य चळवळीत काहीही योगदान नाही. या विचारधारेचे लोक दररोज संविधानाची हत्या करत आहेत. आपला राष्ट्रध्वज तिरंगा मानाने डौलत ठेवायचा असून संविधान व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा, असे आवाहन पटोले यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – PM MODI SPEECH : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केली ‘विश्वकर्मा योजने’ची घोषणा, म्हणाले…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सर्व सामान्य जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. त्या संविधानाचा रोज खून केला जात आहे. भय, भ्रष्टाचारातून सत्ता स्थापन करायाची हेच काम सुरू आहे. ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांनाबद्दल जी भाषा वापरली जात असे तीच भाषा आज वापरली जात आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

जनतेने सावध रहावे
मणिपूर जळत आहे, त्यावर पंतप्रधानांनी संसदेत शब्द काढला नाही, मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढली; पण त्यावर चकार शब्द न काढता काँग्रेसवर टीका करत हास्यविनोद करणारा असंवेदनशील पंतप्रधान देशाने पाहिला. देशाला पुन्हा पारतंत्र्यात लोटण्याचे काम सुरू आहे, बलाढ्य, शक्तीशाली, अत्याचारी ब्रिटिशांना काँग्रेसने देशातून हाकलून लावले आज पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे, जनतेने सावध रहावे, सजग रहावे. भारताला महासत्ता बनवण्याचे काँग्रेसचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार रहा, असे आवाहनही पटोले यांनी केले.

हेही वाचा – लाल किल्ल्यावर खुर्ची रिकामी ठेवून, व्हिडीओद्वारे खर्गेंचे पंतप्रधान मोदींवर शरसंधान

मोदींची अहंकारी भाषा अयोग्य
मी पुन्हा लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवणार अशी भाषा करणारे अहंकारी आहेत. आपल्या देशात नेता मोठा नाही तर देशातील जनता मोठी आहे. कोणाला निवडून आणायचे व कोणाचा पराभव करायचा हा जनतेचा हक्क आहे. बड्या-बड्या नेत्यांचा पराभव जनतेने केला आहे, त्यामुळे ही अहंकारी भाषा अयोग्य आहे. मागील नऊ वर्षं सत्तेत असूनही काँग्रेसला शिव्या देण्याशिवाय त्यांनी दुसरे काय काम केले हे सांगावे? आता काँग्रेसला शिव्या देऊन मोदी आपले अपयश लपवू शकणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष व आमदार वजाहत मिर्झा, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकस, सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, मुनाफ हकीम, प्रमोद मोरे, देवानंद पवार, जोजो थॉमस, सय्यद झिशान अहमद, श्रीरंग बरगे, सुरेशचंद्र राजहंस, राजाराम देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -