ऐश करण्यासाठी ते चोरायचे दुचाकी, अखेर सापडले

मौज मजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ४ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.

दुचाकी चोर

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीच्या घटना घडत आहेत.त्यानुसार शहरात गस्त घालण्याचे प्रमाण पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाढवले आहे. मौज मजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ४ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले असून ७५ हजार किंमतीच्या दुचाकी वाकड पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

वाचा – पुण्यातील २३६ अभियंत्यांनी गमावली नोकरी

मौजमजेसाठी चोरायचे दुचाकी

मयूर जगन्नाथ साचने (२०) हा गोरा कुंभार वसाहतीत राहतो. तसेच त्याच्या जोडीला मेघराज नरसिंग शिंदे (१९) हा वाल्हेकरवाडी येथे राहणारा त्याचा साथीदार दोघे मिळून दुचाकी चोरायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश माने हे कर्मचाऱ्यासह परिसरात गस्त घालत होते, तेव्हा त्यांच्या सहकाऱ्याला वाकड परिसरातील ताथवडे येथे दोन अनोळखी संशयितरित्या दुचाकीवर थांबल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन चौकशी केली असता त्यांनी चार दुचाकी चोरल्याचे कबुली दिली. दुचाकी चोरून ते आलेल्या पैशात मौज मजा करायचे अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.