घरमहाराष्ट्रग्रामपंचायतीतच सापडला चोर, निलंबनाची कारवाई

ग्रामपंचायतीतच सापडला चोर, निलंबनाची कारवाई

Subscribe

उपसरपंच संतोष पाटील यांनी सुमारे ३ लाख ६० हजार रुपयांची रक्कम हडप केली.

भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायत हद्दीतील नळपाणी पुरवठा योजनेची रक्कम ग्रामपचांयतीच्या उपसरपंचाने हडप केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सुमारे ३ लाख ६० हजार रुपयांची रक्कम त्याने परस्पर स्वतःच्या नावे काढून घेतली. या प्रकरणामुळे ठाणे अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी उपसरपंच संतोष गोविंद पाटील यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यत्व रद्दची कारवाई केली आहे.त्यामुळे त्यांना उपसरपंच पदावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढवली आहे. अंबाडी ग्रुपग्रामपंचायती अंतर्गत रवदी, विंचूपाडा, उंबरपाडा, चिरंबे , अंबाडी कॉलनी, कोपरोली आदी महसूली गावांचा समावेश असून यातील अंबाडी गावात २०१६ मध्ये ३ लाख ६० हजार रुपये खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले आहे. सदरचे काम एका मजूर सोसायटीला देण्यात आले होते. मात्र, या कामाचे पैसे उपसरपंच संतोष पाटील यांनी २४ मे व ३ जून २०१६ रोजी परस्पर स्वतःच्या नावे धनादेशाद्वारे काढून हडप केले.


वाचा: रेल्वे प्रवासामुळे शरीरासह मानसिक ताणही वाढतोय

याबाबत समाजसेवक आर.जी.पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन याबाबत अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली असता उपसरपंच संतोष पाटील यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याशी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्रामपंचायत फंडातून परस्पर ३ लाख ६० हजार रुपयांची रक्कम काढून हडप केल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे महाराष्ट्र ग्रा. पं.अधिनियम १९५९ मधील कलम १४ (ग ) नुसार संतोष पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने त्यांच्यावर उपसरपंच पदावरून पाय उतार होण्याची पाळी ओढवली आहे.या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी नारायण जाधव यांच्या सेवापुस्तकात नोंद घेण्याचे आदेश दिल्याने त्यांच्या सेवाशर्थींमध्ये निर्बंध आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -