घरताज्या घडामोडीरायगडच्या किनार्‍यांना थर्टी फर्स्टचे उधाण!

रायगडच्या किनार्‍यांना थर्टी फर्स्टचे उधाण!

Subscribe

अबालवृद्ध ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात, अशा ‘३१ डिसेंबर’ अर्थात ‘थर्टी फर्स्ट’ चा दिवस उजाडण्यास अवघे सहा दिवस राहिल्याने अनेकांना त्याचे वेध लागले आहेत. आतापासूनच सेलिब्रेशनसाठीचे मेन्यू ठरू लागले आहेत. तर दुसरीकडे हॉटेल, धाबा, बार व्यावसायिकही त्या दिवसाच्या उत्साहाला ‘चार चाँद’ लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. पर्यटकांचे आगमन होऊ लागल्यामुळे रायगडच्या समुद्र किनार्‍यांना थर्टी फर्स्टचे उधाण येऊ लागले आहे.

गेल्या काही वर्षांपासून थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरांपुरते किंवा चार भिंतींआड होणार्‍या सेलिब्रेशनचे लोण आता थेट ग्रामीण भागात पोहचले आहे. शहरांतून मोठ्या प्रमाणात हौशे, नवशे या दिवशी रायगडात दाखल होत असल्याने एकूणच उत्साहाला उधाण आल्याचे चित्र अलीकडे पहावयास मिळत आहे. कुटुंबवत्सल पर्यटकही या दिवशी लक्षणीय संख्येने येत असतात. या पर्यटकांची अर्थातच समुद्र किनार्‍यांना पसंती मिळत असते. त्यामुळे समुद्र किनारी ३१ डिसेंबरच्या रात्री गर्दी उसळल्याचे पहावयास मिळते. गर्दीच्या कोलाहलातून बाहेर पडून निवांत जागा पसंत करून कुटुंबासह नव्या वर्षाचे स्वागत करायला येणार्‍यांची संख्याही दखल घेण्याजोगी असते.

- Advertisement -

तळीरामांसाठी ३१ डिसेंबरला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने त्यांच्यासाठी अनेक ठिकाणी भाड्याने मिळणारी फार्म हाऊस, गर्दीपासूनची दूर असणारी हॉटेले सोयीस्कर ठरत असतात. त्यामुळे अशी फार्म हाऊस, हॉटेल पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. बहुतांशी हॉटेल, बार, धाब्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक योजनाही सादर केल्या आहेत. ३१ डिसेंबरचा दिवस यावेळी मंगळवार असल्याने हौशींची सकाळपासूनच सुरू होणारी खाण्या‘पिण्या’ची फर्माइश लक्षात घेऊन आम्ही पूर्ण सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया मुंबई-गोवा महामार्गावरील काही हॉटेल चालकांनी दिली.

या दिवशी होणारी हुल्लडबाजी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. गर्दी होणार्‍या समुद्र किनार्‍यांवर अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. महत्त्वाच्या तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात येणार आहेत. येत्या शनिवारपासूनच थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी येणार्‍यांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -