तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही; संजय राऊतांची उदयनराजेंवर टीका

sanjay raut and udyanraje bhosale
संजय राऊत यांचा उदयनराजेंवर पलटवार

‘छत्रपतींचे वशंज असल्याचे पुरावे द्या’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यानंतर कालपासून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. “कोण कुठल्या घराण्यात जन्मला आहे, म्हणून महाराष्ट्रातील इतर श्रद्धास्थानाविषयी बोलण्याचा अधिकार नाही. तसेच तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीप्रधान देशात चालत नाही. लोकशाहीमध्ये सामान्य माणसाला देखील बोलण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान, राष्ट्रपतींना देखील इथे प्रश्न विचारले जातात. पण तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही तंगड्या तोडण्याची भाषा करता?” असा प्रश्न संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला आहे.

आज के शिवाजी या पुस्तकाचा वाद शमल्यानंतर आता संजय राऊत यांच्या विधानाला धरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. “छत्रपतींच्या गाद्यांचा शिवसेना आणि मी सन्मान करतो. कोल्हापूरचे छत्रपतींचे वशंज आणि खासदार संभाजीराजे भोसले यांचे वडील शाहू महाराज हे पुर्वी शिवसेनेत होते. ते राजकारणातील सदगृहस्थ आहेत. तर साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे वडील अभयसिंहराजे भोसले हे देखील सज्जन गृहस्थ होते. शिवेंद्रराजे यांच्याबद्दलही मला आदर आहे. उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे यांनी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे उदयनराजे यांनी शिवसेनेवर आरोप करण्याआधी कोल्हापूरचे प्रमुख शाहू महाराज यांच्याशी आरोप करण्यापूर्वी चर्चा करायला हवी होती”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, “छत्रपतींच्या सर्व गाद्यांचा कधी ना कधी शिवसेनेशी संबंधित आलेला आहे. भाजपच्या नेत्याने प्रकाशित केलेल्या पुस्तकावर आम्ही प्रश्न विचारला त्यात गैर काय आहे? छत्रपतीचे वशंज राजकारणात नसते किंवा ज्या पक्षाच्या नेत्याने पुस्तक प्रकाशित केले त्या पक्षात वशंज नसते तर आम्ही प्रश्न विचारले देखील नसते. राजकारणात असल्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारले जाणारच.”

तसेच महाराष्ट्रातील ११ कोटी जनता छत्रपतींची वशंज आहे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे. तर मग याअर्थाने आम्ही देखील वशंज ठरतो, असेही राऊत म्हणाले आहेत. भाजपने आता राऊत यांच्याविरोधात आंदोलन सुरु केल्यामुळे राऊत यांनी उदयनराजेंच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. ‘उदयनराजे भोसले हे मोदींना सातारचे पेढेवाले म्हणाले होते. याबाबत भाजप त्यांना माफी मागायला लावणार आहे का?’ असा प्रतिप्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे.