घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअंगणवाडी नव्हे हा तर कोंडवाडा मुलांना श्वाासही घेता येईना

अंगणवाडी नव्हे हा तर कोंडवाडा मुलांना श्वाासही घेता येईना

Subscribe

मोरवाडीतील अंगणवाडीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

नाशिक : विद्यार्थ्यांना पुर्व प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी नाशिक महापालिकेच्यावतीने शहरात प्रत्येक भागात अंगणवाडी बांधण्यात आलेल्या आहेत. सदर अंगणवाड्यांमध्ये ५ वर्षाखालील विद्यार्थ्यांना पुर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात. मात्र मोरवाडी परिसरातील एका अंगणवाडीत जागेअभावी एका छोटयाश्या खोलीतल्या स्वयंपाक घरात भरते. ज्या खोलीत ही अंगणवाडी भरवली जाते त्यात ४० मुलं दाटीवाटीने बसवले जातात. एवढश्या खोलीत या मुलांना अक्षरशः श्वास घेणेही मुश्किल होेते. महापालिका शिक्षण विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.

विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी तसेच त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण घेता यावं याकरीता शहरात अंगणवाडया सुरू करण्यात आल्या. महिला बाल विकास विभागाच्या आईसीडीएस प्रकल्पांतर्गत त्या चालवल्या जातात. एकिकडे शहरातील महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र शहरातील अंगणवाडयांकडे मात्र पुरते दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र मोरवाडी येथील अंगणवाडीत दिसून आले. मोरवाडीतील पंडीतनगर येथे एक अंगणवाडी भरते. महापालिकेने या अंगणवाडीकरीता जागा उपलब्ध करून न दिल्याने एका शेडमध्ये ही अंगणवाडी भरवली जात होती मात्र पावसामुळे या शेडला गळती लागल्याने मुलांना पावसात बसावे लागत होते. मुलांचे हाल होऊ नये म्हणून अंगणवाडी सेविकांनी एका खोलीत या मुलांची बसण्याची व्यवस्था केली. मात्र दहा बाय दहाच्या या खोलीत अक्षरशः ४० मुले कोंबून भरली जातात. यामुळे या मुलांना हालचाल करण्यासच काय श्वासही घेता येत नाही. त्यामुळे येथे आल्यानंतर ही शाळा की कोंडवाडा असा प्रश्न निर्माण होतो.

- Advertisement -

यासंदर्भात आम आदमी पक्षाच्यावतीने शहर समन्वयक जितेंद्र भावे यांनी पर्दाफाश केला. ज्या भागात ही अंगणवाडी भरते तेथे पावसामुळे पाण्याची डबके तयार झाले असून पावसाळयातील साथरोगांमुळे ही मुले विविध आजारांनी बाधित होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळी वातावरणामुळे येथे दुर्गंधीही पसरली आहे. अंगणवाडीची ही अवस्था पाहून पालकांनी मुलांना घरीच बसवणे पसंत केले आहे त्यामुळे आता विद्यार्थी संख्येलाही गळती लागली आहे. अशा अत्यंत गलिच्छ अवस्थेतील अंगणवाडीत देशाचे भविष्य घडवणारे विद्यार्थी शिक्षण कसे घेणार ? देशाचे उज्ज्वल भविष्य कसे घडणार? सदर अंगणवाडीसाठी प्रत्येक वर्षी लाखो रूपयांची आर्थिक तरतूद केली जाते मग हा पैसा जातो कुठे ? असा उद्विग्न सवाल येथील नागरिकांकडून कला जात आहे.

मोरवाडीतील अंगणवाडीची अवस्था बघितल्यानंतर अशा गलिच्छ वातावरणात देशाचे भविष्य घडवणारे विद्यार्थी शिक्षण कसे घेणार ? अशा वातावरणामुळे आता पालकांनी मुलांना अंगणवाडीमध्ये पाठवणेही बंद केले आहे. महापालिकेची अनेक सभागृहे, जागा रिकाम्या आहेत या जागांमध्ये पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. महापालिकेने जागा दिल्यास काही नागरिकांनी स्वखर्चाने अंगणवाडी बांधून देण्याचेही सांगतले. परंतू टक्केवारीचा मलिदा खाण्यात स्वारस्य असलेल्या मुजोर प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या जीवाशी काही देणे घेणे नाही असे दिसते. : जितेंद्र भावे, शहर समन्वयक, आम आदमी पार्टी

दिल्ली मॉडेलचे काय झाले

नाशिकमधील शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरीता मध्यंतरी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिल्ली मॉडेलचा अभ्यास केला मात्र त्यानंतर कोणतेही मॉडेल अस्तित्वात आले नाही. मग दिल्ली दौरा हा वैयक्तिक पर्यटनासाठी होता की काय असाही सवाल आम आदमी पक्षाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -