…हे तर शिवसेनेचं यश, मोदींच्या मुंबई दौऱ्याबाबत संजय राऊत असं का म्हणाले?

PM Narendra Modi on Mumbai Visit | "पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. पंतप्रधानांना कोणी अडवू शकत नाही. पंतप्रधानांना कोणताही विरोध असू शकत नाही. मात्र, राजकारण झालं तर बघू," असं संजय राऊत म्हणाले. 

sanjay raut

PM Narendra Modi on Mumbai Visit |मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि पायाभरणीनिमित्त मुंबईत येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा अत्यंत विशेष असणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराची ही नांदी ठरणार असल्याचं बोललं जात आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर उपरोधिक टिप्पणी केली आहे. शिवसेनेने केलेल्या कामांचं उद्घाटन करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, हे शिवसेनेचं यश आहे, असं संजय राऊत म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – कर्नाटकातून येताना बेळगावसह…, सीमावादावरून राऊतांनी मोदींना डिवचलं

“पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. पंतप्रधानांना कोणी अडवू शकत नाही. पंतप्रधानांना कोणताही विरोध असू शकत नाही. मात्र, राजकारण झालं तर बघू,” असं संजय राऊत म्हणाले.

“शिवसेनेने जे काम केले त्या कामांचं लोकार्पण करण्याकरता मोदी मुंबईत येत आहेत. आज ज्या कामांचं उद्घाटन होणार आहे, त्यापैकी बहुतेक कामं शिवसेनेने केली आहेत. मी मोजून दाखवू शकतो, कोणकोणती कामं आम्ही केली आहेत ते. आम्ही ज्या कामांचं नियोजन केलं होतं, त्या कामांचं उद्घाटन मोदी करणार आहेत. आम्हाला त्यांचा आनंद आहे. या प्रकल्पांची योजना, पायाभरणी, सुरुवात शिवसेनेची सत्ता असताना पालिकेने केली. या कामांचं उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत. हे शिवसेनेचे यश आहे. शिवसेनेमुळे ज्या कामांना गती मिळाली त्या कामांचं उद्घाटन करून प्रचारांचं भूमिपूजन मोदी करत आहेत,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी आज कर्नाटक आणि महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘असे’ असेल मुंबई भेटीचे नियोजन

सीमावादप्रश्नीही छेडलं

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अद्यापही शमलेला नाही. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने दोन्ही राज्यांनी शांततेत वाद सोडवावा असे आदेश केंद्राकडून आले आहेत. त्यामुळे सीमावादाप्रश्नी दोन्ही राज्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. दरम्यान, याच वादावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी ते कर्नाटकात जाणार आहेत. त्यामुळे कर्नाटक सीमाभागात अत्याचार सुरू आहेत. कर्नाटकातून येताना त्यासंदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांना सूचना करून महाराष्ट्रात याबाबत घोषणा करावी, असं आवाहन संजय राऊतांनी मोदींना केलं आहे.

हेही वाचा – मुंबईत आज ठिकठिकाणी नाकाबंदी, वाहतूक व्यवस्थेत बदल; मनस्ताप टाळण्यासाठी ‘ही’ बातमी वाचा

मुंबईत होणार रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईत येतील. तर, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई मेट्रो मार्ग २ए आणि ७ चं उद्घाटन करणार आहेत. तसंच, या मेट्रोमधून ते प्रवाससुद्धा करणार आहेत.

मुंबईत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. या रोड शोमध्ये जवळपास एक लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अशावेळी होत आहे ज्यावेळी मुंबईसहित अनेक महापालिकांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे मोदींचा हा दौरा मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची नांदी ठरणार आहे.