भाजप विरोधात देशातील सर्व पक्ष एकत्रित येण्याची ही सुरूवात : छगन भुजबळ

नाशिक : भाजप विरोधात हळूहळू सर्वच पक्ष एकत्र राहावेत याकरीता हालचाली सुरू झाल्या आहेत. दक्षिण भारतातील मंडळींकडूनही निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हालचाली सुरू आहेत. सगळे पक्ष एकत्र येणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ठाकरे केजरीवाल यांच्या भेटीनंतर व्यक्त केली.

भुजबळ यांनी शनिवारी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. नुकतीच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट झाली. त्यामुळे शिवसेना आप युती होणार का ? याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा रंगू लागल्या आहेत. या भेटीबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले, भाजप विरुद्ध सगळ्यांनी एकत्र राहावे म्हणून हळूहळू हालचाली चालू आहेत. वर्षभरात निवडणुका आल्या आहेत, त्यामुळे हालचालींना प्रारंभ झाला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने काढून घेतले असले, तरी जनता शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच मानते. सगळे पक्ष जर एकत्र येत असतील तर चांगलेच आहे. कारण महागाईचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, नोटबंदी विरोधी बोलणार्‍यांवर कारवाई असेल या सगळ्या गोष्टींचा मारा होत आहे, नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. लोकशाहीवर प्रेम आहे, त्यांना असे आवडत नाही, त्यामुळे लहान लहान पक्ष देखील भाजप विरोधात सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचे भुजबळ म्हणाले.

कांद्याचा प्रश्न गंभीर

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना पत्र पाठवले आहे. शरद पवार यांच्याशी देखील चर्चा केली असून दुसरीकडे कांदा निर्यात थांबवली जात आहे. कशासाठी? ज्या वेळेला कांदा एक्सपोर्ट होईल, त्या वेळेला दोन पैसे जास्त भेटतील. कांद्याचा भाव ज्यावेळी प्रचंड वाढतो, त्यावेळी मध्ये येऊ नका. याविषयी मी शरद पवारांशी बोललो आहे, आम्ही पत्र देखील पाठवले आहे. कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. अनेक देशात कांद्याचा तुटवडा आहे, मग निर्यात का होत नाही. सरकारने केंद्रीय कृषिमंत्री तसेच राज्य सरकारने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी विनंतीही भुजबळ यांनी केली.