घर महाराष्ट्र ...हाच सगळ्यांना प्रेमाचा सल्ला, ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा

…हाच सगळ्यांना प्रेमाचा सल्ला, ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा

Subscribe

मुंबई : सत्तेच्या मस्तवालपणातून जमा केलेल्या गडगंज इस्टेटीवर ईडी, इन्कम टॅक्सचे मुंगळे चढले. ते मुंगळे डसू लागल्यावर भाजपाच्या गोठ्यात शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, 2024मध्ये नक्कीच सत्ताबदल होत आहे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे ‘‘आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील.’’ महाराष्ट्राच्याच नव्हे तर, देशाच्या बेइमानांना तेव्हा दया नसेल! सत्तेची भूक तोपर्यंत सगळ्यांनीच शमवून घ्यावी हाच सगळ्यांना प्रेमाचा सल्ला, अशा शब्दांत ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – आगामी मुंबई महापालिका निवडणुकांबाबत सत्ताधाऱ्यांची रणनीती ठरली; विरोधकांचा अशाप्रकारे करणार पराभव

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे व अजित पवार हे कोणत्याही उदात्त विचाराने पक्षाबाहेर पडलेले नाहीत तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरेंच्या चौकश्या नकोत, या भयाने त्यांनी गुडघे टेकले हे बारामतीत त्यांच्यावर फुले उधळणारी जनताही जाणते, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

मतदारांना विकासापासून दूर ठेवायचे कारस्थान
शिंदे-अजित पवारांच्या विकासाच्या व्याख्या म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची फसवणूक आणि लूट आहे. आपापल्या गटातील फुटीर आमदारांनाच कोट्यवधीचा निधी द्यायचा व त्या निधीच्या कमिशनबाजीतून महाराष्ट्रात बेइमानाचे बीज वाढवायचे. जे आमदार आपल्या गटात नाहीत त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक फुटकी कवडी द्यायची नाही, तेथील मतदारांना विकासापासून दूर ठेवायचे अशी बनवाबनवी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री करीत आहेत, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने आहे.

- Advertisement -

काकांचा पक्ष का फोडला?
अजित पवार यांचे जे सांगणे आहे की, मला सत्तेची हाव नाही. ते खरे असेल तर त्यांनी आमदारांना गोळा करून आपल्या काकांचा पक्ष का फोडला? जो पक्ष काकांनी स्थापन केला त्याच काकांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून का हाकलले? आता सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे की, ‘‘अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,’’ सत्तेची हाव नसल्याचे हे लक्षण अजिबात नाही, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

हेही वाचा – इतर देशांना केवळ बाजारपेठच मानले तर… पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा

अजित पवारांना सर्वच आयते मिळाले
अजित पवार यांना ‘हाव’, ‘भूक’ नसती तर त्यांनी सरळ राजकारणसंन्यास घेऊन कृषी, सामाजिक कार्यात झोकून दिले असते व ते जर प्रामाणिक, स्वाभिमानी राजकारणी असते तर काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी स्वतःचा नवीन जागतिक पक्ष स्थापन करून वेगळे राजकारण केले असते, पण अजित पवारांना सर्वच आयते मिळाले, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

…म्हणून तुमची सत्तेची ‘हाव’ पूर्ण झाली
एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपाने जे अचाट, पण बुळेगिरीचे काम करून घेतले तेच काम अजित पवारांकडून करून घेतले. मुळात शिवसेना ही जशी ‘मिंधे’ गटाची नाही, तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अजित पवार गटाचा नाही. शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांचाच पक्ष राहू शकतो. मात्र भाजपाने त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ‘घाव’ घातला म्हणून तुमची ही सत्तेची ‘हाव’ पूर्ण झाली आहे, हे या पक्षांवर बेगडी दावा सांगणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. तेव्हा आपल्याला सत्तेची हाव नाही वगैरे अजित पवारांचे बोलणे झूठ आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisment -