घरताज्या घडामोडी'हे' बलिदान वाया नाही जाणार,एसटी कर्मचाऱ्यांनी पुढे केला मदतीचा हात!

‘हे’ बलिदान वाया नाही जाणार,एसटी कर्मचाऱ्यांनी पुढे केला मदतीचा हात!

Subscribe

एसटीच्या दोन  कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर जाग आलेल्या शासनाने त्यांचे दोन महिन्याचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे मान्य केले. पण ज्या दोघांच्या प्राणत्यागामुळे हे थकीत वेतन आपल्याला मिळत आहे, या कृतज्ञतेतून बाकीच्या एसटी कर्मचार्‍यांनी त्यांच्या नातेवाईकांना आपल्या ऐपतीनुसार अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.  

दिवाळी सण तोंडावर आला असताना गेल्या तीन महिन्यांचे वेतन थकल्यामुळे एसटीच्या दोन  कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर जाग आलेल्या शासनाने त्यांचे दोन महिन्याचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे मान्य केले. पण ज्या दोघांच्या प्राणत्यागामुळे हे थकीत वेतन आपल्याला मिळत आहे, या कृतज्ञतेतून बाकीच्या एसटी कर्मचार्‍यांनी त्यांच्या नातेवाईकांना आपल्या ऐपतीनुसार अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी आणि जळगावमधील एसटीच्या दोन कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्यावर सर्वत्र शोककळा पसरली. त्यानंतर शासनाने तात्काळ कर्मचार्‍यांचे थकीत वेतन देण्याची घोषणा केली. या दोन्ही कर्मचार्‍यांमुळे एक लाख कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला. मात्र ज्यांनी जीव गमावले, त्यांच्या कुटुंबियांसाठी  इतर  कर्मचारी त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी  प्रयत्न करत आहेत.

एसटी कर्मचार्‍यांकडून माणुसकीचा स्पर्श  

सोमवारी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या तीन महिन्यांचे थकीत वेतन मिळण्याकरिता आपल्या राहत्या घरी कुटुंबासह आक्रोश आंदोलन करत होते. आंदोलनामार्फत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असताना सकाळी जळगावच्या एसटी कंडक्टर मनोज चौधरी यांनी आत्महत्या केली. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती.माझ्या आत्महत्येला जबाबदार ठाकरे सरकार आणि एसटी महामंडळ असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमुद केले होते. ही बातमी प्रसार माध्यमांवर येताच सर्वत्र ठाकरे सरकारवर टीका सुरू झाली. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन एसटी कर्मचार्‍यांना दिवाळी पूर्वी वेतन देण्याचे जाहीर केले. तसेच मंगळवारी राज्य सरकारने एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज एसटी महामंडळाला देण्याची घोषणा केली. मात्र शासनाच्या आणि एसटी महामंडळाच्या या गलथान कारभारामुळे एसटीच्या दोन कर्मचार्‍यांचा नाहक जीव गेला. त्यामुळे राज्यभरातील एसटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांनी माणुसकीला जागून त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक एसटी कर्मचारी आपल्या ऐपतीनुसार या दोन्ही कुटुंबिंयाना आर्थिक मदत करणार आहे.  कुणी १०० रुपये, तर कुणी ५०० रुपयांची मदत करण्याची मोहीम आता सुरु केली आहे.

- Advertisement -

आमची मदत अपुरी

ज्या दोन कर्मचार्‍यांच्या बलिदानानंतर एसटी महामंडळातील एक लाख एसटी कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाच्या तिढा सुटला असला तरी यंदाची आमची दिवाळी ही दु:खात जाणार आहे. कारण हे दोन्ही कर्मचारी आमच्या एसटी कुटुंबातील होते. त्यांच्या वेदना आणि त्यांच्यावर आलेल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे यासंकटकाळात आम्ही एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना जेवढी जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची मदत अपुरी आहे, याची जाणीवसुध्दा आम्हाला आहे, अशी प्रतिक्रीया चंद्रपुर विभागातील एसटी कर्मचारी समीर येसेकर यांनी दिली आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित वेतनाचा तिढा आम्ही सोडवला असे म्हणणे हे दुर्दैवी असून राज्यभरातील एसटी कर्मचारी दोन सहकार्‍यांच्या मृत्यूने चिंतेत असताना संघटनांकडून अशी वक्तव्ये योग्य नाहीत. सर्वानी परिस्थितीचे भान ठेऊन गांभीर्य ओळखून संवेदनशील व्हावे आणि मृत कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहावे.
 – श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -