मुंबईमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात ५.४९ लाख किलो निर्माल्य जमा

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक व घरगुती गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आलेल्या हार, फुले, दुर्वा यांच्या माध्यमातून तब्बल ५ लाख ४९ हजार ५१५ किलो निर्माल्य जमा झाले आहे.

मुंबई : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक व घरगुती गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आलेल्या हार, फुले, दुर्वा यांच्या माध्यमातून तब्बल ५ लाख ४९ हजार ५१५ किलो निर्माल्य जमा झाले आहे. कोरोना कालावधीत साजरा करण्यात आलेल्या २०२१ च्या गणेशोत्सवात २.६५,९८९ किलो निर्माल्य जमा झाले होते. तर २०२० ला २,९९,२७६ किलो निर्माल्य जमा झाले होते. मात्र २०१९ च्या गणेशोत्सवात तब्बल १०,८२,१८६ किलो निर्माल्य जमा झाले होते. (this year Ganeshotsav in Mumbai 5.49 kg flowers was accumulated)

त्यामुळे अनुक्रमे २०२१ – २०२० च्या तुलनेत यंदा निर्माल्यात अडीच, पावणेतीन लाख किलोने घट झाल्याचे तर २०१९ च्या तुलनेत यंदा तब्बल ५ लाख किलोने घट झाल्याचे समोर येते.या निर्माल्यापासून पालिका लवकरच खताची निर्मिती करणार आहे. या खताचा वापर पालिकेच्या उद्यानांमध्ये करण्यात येणार आहे.

मुंबईत ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला विघ्नहर्ता श्रीगणेशाचे आगमन झाले होते. गणेश भक्तांनी मोठ्या जल्लोषात, धुमधडाक्यात गणेशाचे स्वागत केले. दीड, पाच, सहा, सात व दहा दिवसांच्या गणेशाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यावेळी गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात हार, फुले, दुर्वा अर्पित करून गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. बच्चे कंपनी, महिला मंडळी यांनीही गणेशाची पूजाअर्चा करून भरभरून आशीर्वाद घेतले.

सर्वाधिक निर्माल्य भांडुप,अंधेरी, बोरिवलीत जमा

गणेशाच्या चरणी लाखो भक्तांनी अर्पित केलेले हार, फुले, दुर्वा हे विसर्जन स्थळी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशात ते जमा करण्यात आले. पालिकेच्या २४ प्रभागात तब्बल ५ लाख ४९ हजार ५१५ किलो निर्माल्य जमा झाले आहे.

यामध्ये, सर्वात जास्त निर्माल्य हे भांडुपमध्ये ७७,८२५ किलो, अंधेरी (प.) – ५९,५०० किलो, बोरिवली येथे ५५,७०० किलो, वांद्रे येथे ४६,२८० किलो, कुर्ला येथे ४५,४५० किलो इतके निर्माल्य जमा झाले आहे. तर, सॅण्डहर्स्ट रोड – २५३ किलो आणि मरिन लाईन्स येथे ९०० किलो इतके कमी निर्माल्य जमा झाले आहे.

या निर्माल्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार खताची निर्मिती लवकरच करण्यात येणार आहे.या खताचा वापर झाडांसाठी करण्यात येणार आहे.

यंदा गणेशोत्सवा दरम्यान मुंबई शहर व उपनगरात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी ४१९ निर्माल्य कलश पुरविण्यात आले होते. त्याचबरोबर हे निर्माल्य गोळा करुन खत निर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी ३८१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

२४ प्रभागात जमा झालेले निर्माल्य

 • ए विभाग – १,०१० किलो
 • बी विभाग – २५३ किलो
 • सी विभाग – ९०० किलो
 • डी विभाग – २२,२९६ किलो
 • ई विभाग – १,३५५ किलो
 • एफ दक्षिण विभाग – १२,७५० किलो
 • एफ उत्तर विभाग – ६,५५० किलो
 • जी दक्षिण विभाग – १३,३५५ किलो
 • जी उत्तर विभाग – ३७,१५५ किलो
 • एच पूर्व विभाग – ४६,२८० किलो
 • एच पश्चिम विभाग – ११,८०० किलो
 • के पूर्व विभाग – २९,७९० किलो
 • के पश्चिम विभाग – ५९,५०० किलो
 • पी दक्षिण विभाग – २७,४८५ किलो
 • पी उत्तर विभाग – १७,५७९ किलो
 • एल विभाग – ४५,४५० किलो
 • एम पूर्व विभाग – ३६,९३३ किलो
 • एम पश्चिम विभाग – ८,०५० किलो
 • एन विभाग – ४,६८५ किलो
 • एस विभाग – ७७,८२५ किलो
 • टी विभाग – १३,६५५ किलो
 • आर दक्षिण विभाग – ८,०७० किलो
 • आर मध्य विभाग – ५५,७०० किलो
 • आर उत्तर विभाग – ११,०८९ किलो

हेही वाचा – वाहतूककोंडीत अडकलेल्या डॉक्टरांनी 3 किमी धाव घेत वाचवला रुग्णाचा जीव