घरताज्या घडामोडीFlashBack 2019: मराठी चित्रपटांसाठी कसं गेलं हे वर्ष?

FlashBack 2019: मराठी चित्रपटांसाठी कसं गेलं हे वर्ष?

Subscribe

२०१९ साली एकूण लहान-मोठे मिळून १०० च्या घरात चित्रपट प्रदर्शित झाले.

मराठी चित्रपटासाठी यंदाचे वर्ष मिश्र होते. २०१९ या सरत्या वर्षात काही मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली तर काही चित्रपट दणकून आपटले. २०१९ साली एकूण लहान-मोठे मिळून १०० च्या घरात चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र त्यातील हातावर मोजण्या इतकेच चित्रपट आज मराठी प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. त्यातील हिरकणी, खारी बिस्कीट, बाबा, गर्लफ्रेंड, कागर, आनंदी गोपाळ, फत्तेशिकस्त या चित्रपटांनी हे वर्ष गाजवले. या मोजक्याच चित्रपटांनी २०१९ या वर्षात मराठी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. हे वर्ष ऐतिहासिक चित्रपटांसाठी मात्र काही खास ठरले आहे.

ऐतिहासिक चित्रपटांची बाजी

२०१९ या वर्षात बॉलिवूडप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीवर देखील ऐतिहासिक चित्रपटांचा पगडा दिसून आला. या वर्षात आनंदी गोपाळ, हिरकणी, फत्तेशिकस्त या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ऐतिहासिक चित्रपटांचा हा ट्रेण्ड प्रेक्षकही उस्फूर्तपणे स्वीकारत आहेत. मधल्या काळात ‘सर्जा’ व ‘रमा माधव’ हे चित्रपट सोडले तर ऐतिहासिक चित्रपट फारसे आले नाहीत. तेव्हा बहुतांश चित्रपट हे कौटुंबिक आणि विनोदी चौकटीतच बनत होते. ‘फर्ंजद’ मुळे ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेण्ड पुन्हा सुरू झाला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांच्या कमाईबरोबरच लोकप्रियताही कमावली. या चित्रपटात वापरलेले ‘व्हीएफएक्स’ तांत्रिकदृष्ठ्याही ऐतिहासिक मराठी चित्रपट मागे नाहीत यावर शिक्कामोर्तबच करतात.‘हिरकणी’ या चित्रपटात ४०० पेक्षा जास्त व्हीएफएक्स वापरले गेले आहेत. त्यामुळे यंदाच वर्ष फत्तेशिकस्त आणि हिरकणी या दोन ऐतिहासिक चित्रपटांमुळे आणि आनंदी गोपाळ या बायोपिकमुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी यंदाच वर्ष खास ठरले.

- Advertisement -

चित्रपटांच्या विषयात नाविण्य

मागील दहा वर्षांत तर मराठी चित्रपटसृष्टीत अमुलाग्र बदल झाला आहे. काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक, विरंगुळा होईल अशा चित्रपटांची निर्मिती होत होती. कालांतराने या विषयांमध्ये बदल होऊ लागला. आजवर दुर्लक्षित असलेले विषय आणि परिघाबाहेरील विषय हाताळले जाऊ लागले. टकाटक, लकी, रॉमकॉम, गर्ल्स यांसारख्या चित्रपटातून बोल्ड विषय हाताळायला आता मराठी चित्रपटसृष्टी धजावते. यावर्षी आलेल्या या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे नशीबवान, कुलकर्णी चौकातला देशपांडे, बाबा, गर्लफ्रेंड, बंदीशाळा, खारी-बिस्कीट हे वेगळ्या विषयांवर आधारीत चित्रपट सरत्या वर्षाचे आकर्षण ठरले. बाबा या चित्रपटातून वडील आणि मुलाचे हळवे नात प्रेक्षकांसमोर उलगडले. तर संजय जाधव दिग्दर्शित खारी – बिस्कीटाने भावा-बहिणीच्या गोड नात्यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर कुलकर्णी चौकातला देशपांडे हा गजेंद्र अहिरे लेखक-दिग्दर्शित चित्रपटाचा विषय असाच काहीसा वेगळा ठरला. तर अमेय वाघ आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांची मुख्य भूमिका असणारा ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाची त्याच्या वेगळ्या मांडणीमुळे चर्चा झाली. सैराट या चित्रपटामुळे केवळ मराठी प्रेक्षकांचीच नाही तर बॉलिवूडमध्येही आर्चीची चर्चा झाली. अशी रिंकू राजगुरू हीची मुख्य भूमिका असणारा कागर हा चित्रपट गावाकडील राजकारणावर आधारीत होता. या चित्रपटातही रिंकूने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. कागर हा चित्रपट देखील त्याच्या मांडणीमुळे वेगळा ठरला. पण अनेकांनी हा चित्रपट सैराट चित्रपटाची कॉपी असल्याचेही म्हटले.

नवीन चेहर्‍यांना संधी

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवीन कलाकार पुढे येत आहेत. २०१९ मध्ये आलेल्या बहुतांशी चित्रपटात नवीन कलाकारांना संधी देण्यात आली होती. बकाल या चित्रपटातून चैतन्य मेस्त्री हा युवा कलाकार दिसला. तर मकरंद माने दिग्दर्शित कागर चित्रपटातून सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकर तावडेने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तर परफ्युम या युथफूल चित्रपटात ओमकार दिक्षीत आणि मोनालिसा बागल हे कलाकार दिसले. तर झी मराठीवरील मालिकेतील प्रसिध्द चेहरा किरण ढाणे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. त्याचबरोबर सिनीयर सिटीझन्स या सिनीयर सिटीझन्सचे प्रश्न मांडणार्‍या चित्रपटात अनेक नवीन कलाकार दिसले.

- Advertisement -

सिक्वल, प्रीक्वलकडे प्रेक्षकांची पाठ

एखादा चित्रपटाचा सिक्वल येणे हे काही प्रेक्षकांसाठी नवीन नाही. आजपर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये सातत्याने हा प्रयोग केला आणि तो काही प्रमाणात यशस्वीही झाला. आता हाच ट्रेंड मराठी चित्रपटसृष्टीतही रूजू होऊ पहात आहे. २०१९ या वर्षात आलेल्या सिक्वलला प्रेक्षकांनीही बर्‍यापैकी प्रतिसाद दिला. फत्तेशिकस्त,येरे येरे पैसा २, ट्रीपल सीट, हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. यातील दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्तेशिकस्त हा चित्रपट वगळता. इतर चित्रपटांना प्रेक्षकांना फारसा प्रतिसाद दिला नाही. चित्रपटातील कथेतील फोलपणा आणि उत्तम दिग्दर्शनाचा अभाव यामुळे हे दोन्ही चित्रपट फारसे प्रेक्षकांना आवडले नाहीत.

हे चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले..

२०१९ या वर्षात काही मोजक्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. तर अनेक चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. कथेतील अस्पष्टता, विषयाची अयोग्य मांडणी, चित्रपटातील नवीन कलाकार अशा अनेक कारणांमुळे यावर्षी काही चित्रपट सपशेल आपटले. ती अ‍ॅण्ड ती, वेडिंगचा शिनेमा, लकी, मी पण सचिन, कुलकर्णी चौकातला देशपांडे, लव्ह यू जिंदगी, व्हॉट्स अप लव, मोगरा फुलला, येरे येरे पैसा २, ट्रीपल सीट, कॉपी, आप्पा आणि बाप्पा,बकाल या चित्रपटांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.

या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

२०१९ हे वर्ष सरले. पण आता २०२० मध्ये येणार्‍या चित्रपटांची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू आहे. २०२० च्या सुरूवातीला ‘धुरळा’ उडवतच नवीन वर्षाची सुरूवात होईल. सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव अशी तगडी स्टार कास्ट असलेला धुरळा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता चित्रपटाची प्रतिक्षा आहे. त्याचबरोबर अनेक ऐतिहासिक चित्रपट २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येतील. यातील अजय देवगणचा तान्हाजी हा चित्रपट मराठी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चर्चा आहे. शिवाय दिग्दर्शिक प्रविण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाची उत्सुकता आहे. त्याचबरोबर सत्यशोधक, मेकअप, पाँडेचरी असे वेगळ्या विषयांच्या चित्रपटामुळे २०२० हे वर्ष प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -