Homeताज्या घडामोडीनाट्य दिग्दर्शक सतीश आळेकर यांना यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर; कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा घोषणा

नाट्य दिग्दर्शक सतीश आळेकर यांना यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर; कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा घोषणा

Subscribe

साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने एक वर्षाआड दिला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार हा मराठी नाटककार, नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी १० मार्च २०२५ रोजी या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (दि.२७) आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. (This year’s Janasthan Award announced for theatre director Satish Alekar; Kusumagraj Pratishthan’s announcement)

पुरस्काराची घोषणा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे वसंत डहाके, कुमार केतकर, विलास लोणारी यांनी केली. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

‘ज्ञानपीठ’प्राप्त प्रख्यात साहित्यिक, नाटककार व कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून १९९१ पासून दर वर्षाआड हा पुरस्कार मराठी साहित्यात अतुलनीय कामगिरी करणार्‍या साहित्यिकाला प्रदान केला जातो. त्यामुळे मराठी साहित्यात या पुरस्काराचे स्थान अनन्यसाधारण आहे. यंदाच्या आठराव्या जनस्थान पुरस्कारासाठी सतीश आळेकर याची पुरस्कार निवड समितीने एकमताने निवड केली. पत्रकार परिषदेस कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त लोकेश शेवडे, ड. अजय निकम, प्रकाश होळकर, संजय पाटील, भास्कर ढोके उपस्थित होते.

सतीश आळेकर यांना जून २०१२ मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अतुल पेठे यांनी ’नाटककार सतीश आळेकर’ नावाचा लघुपट बनवला आहे. आळेकर यांचा जुलै २०१२ मध्ये एनसीपीएच्या ‘प्रतिबिंब’ नाट्यमहोत्सवात विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्कार, तन्वीर सन्मान , एशियन कल्चरल कौन्सिल(न्यूयॉर्क)चा सन्मान, नांदीकार सन्मान, द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा फर्ग्युसन अभिमान पुरस्कार, फुलब्राईट शिष्यवृत्ती, फोर्ड फाऊंडेशनची शिष्यवृत्ती, बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाऊंडेशनचा बलराज साहनी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी सन्मान, सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आजवरचे ‘जनस्थान’ पुरस्कारार्थी

विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२००१), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबूराव बागूल (२००७), ना. धों. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे (२०१३), अरुण साधू (२०१५), विजया राजाध्यक्ष (२०१७), वसंत आबाजी डहाके (२०१९), मधु मंगेश कर्णिक (२०२१), ज्येष्ठ लेखिका आशा बगे (२०२3).