यंदाची दाजीबा वीरांची मिरवणूक निर्बंधमुक्त आणि उत्साहात

नाशिक : नवसाला पावणारया दाजीबा वीर मिरवणूक मंगळवारी (दि. ७) धार्मिक उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजीबा वीराचे भक्तीपूर्ण वातावरणात दर्शन घेतले. शहरातील बुधवार पेठ, फावडे लेन येथून दाजीबा वीरांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर रांगोळी काढण्यात येउन वीरांचे स्वागत करण्यात आले.

देशासह राज्यभरात धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकची धुलिवंदनाला एक अनोखी परंपरा आहे आणि ती म्हणजे वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक. तीनशे वर्षांपासून ही परंपरा सुरु असून हा दाजीबा नवसाला पावणारा देव असून तो सर्वांचे विघ्न दूर करतो असा समज आहे. जुने नाशिक परिसरातील दाजीबा वीर अर्थातच बाशिंगे वीर अशी या वीरांची ख्याती असून विविध देवांची वेशभूषा ते परिधान करतात. डोक्याला भरजरी वस्त्रं, कानात सोन्याच्या पगड्या, हातात सोन्याचे कडे, पायात जोडा असा वेष धारण करून वाजत गाजत या वीर दाजीबाची मिरवणूक काढयात आली. घरासमोर रांगोळी काढत तसेच ठिकठिकाणी औक्षण करत या दाजिबांचे स्वागत करण्यात आले. जुन्या नाशिकमधून या मिरवणुकीला सुरुवात होऊन जूनी तांबट लेन, रविवार पेठ मार्गे गंगाघाटावरून परत जुन्या नाशिक मध्ये या मिरवणुकीचा समारोप झाला.

वीर नाचवण्याची परंपरा

नाशिकमध्ये धुळवडीच्या दिवशी वीरांना नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. वेगवेगळया देव देवतांचे मुखवटे धारण करून हे वीर नाचवले जातात. गोदावरी काठावर ही मिरवणूक आल्यानंतर देवांना स्नान घालण्यात येउन मिरवणुकीचा समारोप झाला.