Coronavirus : क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्यांना हवंय मासांहारी जेवण!

महापालिकेच्यावतीने पुरवण्यात येणाऱ्या शाकाहारी तथा सात्विक भोजनाऐवजी क्वारंटाईनमधील लोकांकडून मांसाहारी जेवणाची मागणी होत आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ७०० पार झालेली असून कोरोनाग्रस्तांच्या निकट संपर्कात आलेल्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने अलगीकरण केंद्रात अर्थात क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवले जाते. या क्वारंटाईन सेंटरमध्ये बाधित क्षेत्रातील लोकांना जेवण, नाश्तासह सर्व प्रकारची सुविधा पुरवली जाते. परंतु महापालिकेच्यावतीने पुरवण्यात येणाऱ्या शाकाहारी तथा सात्विक भोजनाऐवजी क्वारंटाईनमधील लोकांकडून मांसाहारी जेवणाची मागणी होत आहे. ही मागणी पूर्ण केली जात नसल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दमदाटीही केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. एकाबाजुला कोरोनामुळे मुंबईकर हादरलेले असताना दुसरीकडे या आजाराच लागण अन्यथा कुठे पसरु नये, म्हणून सुरक्षिततेचा कारणास्तव क्वारंटाईन केलेल्या लोकांच्या या मागणीमुळे या आजाराचे गांभीर्य अद्यापही या लोकांना समजलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढू लागलेली असून या वाढत्या संख्येमुळे मुंबईकरांचीही भीतीने गाळण उडालेली आहे. आतापर्यंत मुंबईत ७०० हून अधिक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत मुंबईत ३८१ बाधित क्षेत्र घोषित केली होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास हायरिस्क अशाप्रकारे निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्राधान्याने क्वारंटाईनमध्ये पाठवले जाते. मुंबईत अशाप्रकारे प्रत्येक वॉर्डमध्ये क्वारंटाईनच्या जागा निश्चित करून तिथे रुग्णांच्या अगदी संपर्कात आलेल्यांना पाठवले जाते. त्यामुळे या क्वारंटाईनमध्ये महापालिकेच्यावतीने शाकाहारी तसेच सात्विक जेवण दिले जाते. याशिवाय चहा तसेच नाश्ताही दिला जातो. परंतु या क्वारंटाईनमध्ये किमान १४ दिवस राहावे लागत असल्यामुळे काही लोकांची मानसिकता बिघडत चालली आहे. विशेषत: मांसाहार करणाऱ्या लोकांना शाकाहारी जेवणाला विरोध होतो. त्यापेक्षा मांसाहारी चिकन अथवा मटन बिर्याणीची मागणीच अधिक होताना दिसत आहे.

महापालिकेच्या सर्वच विभाग कार्यालयांमधील क्वारंटाईनमध्ये ही परिस्थिती असून यामुळे महापालिकेचे अधिकारी हवालदिल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रोजच शाकाहारी जेवण असल्यामुळे लोकांकडून मांसाहारी जेवणाची मागणी होत आहे. यामध्ये विशेषत: मुस्लिम समाजाच्या लोकांकडून चिकन व मटण बिर्याणीची मागणी होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुस्लिम तरुणांनी आम्हाला मांसाहारी जेवण न दिल्यास आम्ही मीडियाकडे जावू आणि आम्हाला योग्य जेवण दिले जात नसल्याची तक्रार करू, अशी दमदाटीही करण्यास सुरुवात केली. याची कल्पना खुद्द पोलिसांनाही देण्यात आलेली आहे.

कोरोनाचा संसर्ग अधिक होवू नये, म्हणून आम्ही सुरक्षिततेचा उपाय म्हणून क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. त्यामुळे तिथे जेवण पुरवले जाते. जेवणाअभावी कुणाचे हाल केले जात नाही. तरीही केवळ शाकाहारी नको तर मांसाहारी द्या, ही मागणी योग्य नसून त्या लोकांनी आम्हाला सहकार्य केल्यास यावर मात करता येईल. नाहीतर यांच्याच मागे धावायला लागलो तर आजार अधिक पसरेल, अशी भीतीही काही महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी व्यक्त केली.