मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कांद्याच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. यावरून भाजपाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) सल्ला देऊ शकतात, त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणे म्हणजे आश्चर्य नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहीमेवरून आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्यावर टीका करत आहेत.
करोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही.संपूर्ण जगात…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 25, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे एक अजब रसायन आहे. चांद्रयानाने ऐतिहासिक यश मिळविले तेव्हा मोदी हे दक्षिण आफ्रिकेत होते. यावर मोदी यांनी परदेशातून संदेश दिला की, ‘‘भारताने ऐतिहासिक यश मिळविले आहे. मात्र आता तेवढ्याने समाधान होणार नाही. आता सूर्य-शुक्रासह विविध ग्रह भारताचे लक्ष्य असेल.’’ पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. चंद्रानंतर देशाला त्यांनी शुक्रावर, सूर्यावर कदाचित धूमकेतूवरही उतरवून संशोधन करायचे ठरविले आहे, असा निशाणा ठाकरे गटाने नरेंद्र मोदी यांच्यावर या अग्रलेखातून साधला आहे.
हेही वाचा – देशाला धूमकेतूवरही उतरवून संशोधन…, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
तर, केंद्र सरकारच्या कांदा खरेदीवरूनही ठाकरे गटाने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकारने दिलेले 2410 रुपये खरेदी मूल्याचे आश्वासन ‘नाफेड’च पाळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या आरोपावर राज्य सरकारचे काय म्हणणे आहे? उठता बसता ‘शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असे म्हणणारे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी आता शेतकऱ्यांना पाठ दाखवून कुठे पळाले आहेत? या प्रश्नावर थेट जपानवरून ‘टिव टिव’ करणारेदेखील सोयिस्कर मौन का बाळगून आहेत? असे सवाल ठाकरे गटाने केले आहेत.
या टीकेला भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहीमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. कोरोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात, त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणे म्हणजे आश्चर्य नाही. संपूर्ण जगात चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करीत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात, या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिले होते, पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांना पाठ दाखवून कुठे पळाले? राज्य आणि केंद्र सरकारवर ठाकरे गटाचे टीकास्त्र
कांद्याच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांचे अश्रू अद्याप थांबलेले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली. उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.