नाशिक : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या सर्व्हेनुसार आगामी निवडणुकीत काँग्रेसला सुमारे ४० जागा मिळतील, असे सांगितले जाते. या सर्व्हेवरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसचा दावा खोडून काढला. ४० जागा कशाला सर्वच्या सर्व ४८ जागा त्यांना मिळतील, असे सांगत ज्यांच्याकडे उमेदवार नाही त्यांनी अशाप्रकारची वक्तव्ये करणे म्हणजे कमाल आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या विधानाची खिल्ली उडवली.
उद्योगमंत्री सामंत गुरूवारी (दि.१७) नाशिक दौर्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेतली. राज्यात पुन्हा पवार यांनी सभा सुरू केल्या आहेत, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, नेत्याची सभा होणे हा लोकशाहीचा एक भाग आहे. उद्या सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या सभा होतील शेवटी नेत्यांनी विचार मांडल्यानंतर लोक ठरवणार आहेत. त्यामुळे याबाबत फार विचार करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. शासन आपल्या दारी उपक्रम हा इव्हेंट असल्याची टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली.
मात्र, ज्यांना असे उपक्रम राबविण्याची सवय नाही त्यांच्या टिकेला फार महत्व नाही. शासन आपल्या दारी उपक्रमातून आजपर्यंत राज्यातील सव्वा कोटी जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. कोणाच्या टिकेमुळे हा कार्यक्रम थांबणार नसल्याचे सामंत म्हणाले. आमचे मुख्यमंत्री आम्हाला अडचणीत सापडलेले दिसले. म्हणून मी मंत्रीपदापासून माघार घेतली, असे वक्तव्य शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी केले. याबाबत सामंत म्हणाले, गोगावले यांनी असे कुठलेही वक्तव्य केले नसल्याचा खुलासा केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दूरवस्थेप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला. याबाबत बोलताना सामंत म्हणाले, याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली असता ठेकेदाराच्या काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे हा महामार्ग रखडला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण दर आठ दिवसांनी या महामार्गाच्या कामाचा आढावा घेत आहेत. गणपती उत्सवापूर्वी एक लेन काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. नाशिक-मुंबई मार्गावरील खड्ड्यांबाबत प्रवास सुखकर झाल्याचे सांगत तीन तासांत नाशिकला आल्याचे नमूद केले.