घरCORONA UPDATECoronaEffect: राज्यात ५० हजार गुन्ह्यांची नोंद, १० हजार जणांना अटक!

CoronaEffect: राज्यात ५० हजार गुन्ह्यांची नोंद, १० हजार जणांना अटक!

Subscribe

मुंबई शहरासह संपूर्ण राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात कलम ११८ नुसार दाखल झालेल्या गुन्ह्याची संख्या जवळपास ५० हजारावर गेली आहे. यापैकी अधिक गुन्ह्यांची नोंद पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईत झाली आहे. या दरम्यान राज्यभरात १० हजार २७६ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली असून अवैध वाहतुकी प्रकरणी १ हजार ४४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे १ कोटी ८२ लाख ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

देशभरात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २२ मार्च पासून लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत ३ मे पर्यंत वाढ करण्यात आलेली असून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबईसह राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. २२ मार्च ते १७ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या गुन्ह्यांची संख्या जवळपास ५० हजार झालेली असून १० हजार २७६ जणांना अटक करून जामिनावर सोडून देण्यात आलेले आहे. तसेच ३२ हजार ४२४ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. सर्वात अधिक गुन्हे पुणे, पिपरी-चिंचवड, आणि मुंबईत दाखल आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत कारवाई करणाऱ्या पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांवर राज्यभरात वेगळ्या १०२ गुन्ह्यांची नोंद झालेली असून १६२ जणांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

या दरम्यान राज्यभरात अवैध वाहतूकी करणाऱ्या १ हजार ४४ वाहतूकदारांवर कारवाई करण्यात आलेली असून सुमारे १ कोटी ८२ लाख ७६ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली असल्याची माहिती राज्य पोलीस विभागाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलेली आहे. या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० क्रमांकावर ७० हजार ३०७ तक्रारींचे कॉल आलेले असून या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आलेली आहे. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ५५५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले आहे.

७ अधिकाऱ्यांसह २३ पोलीस पॉझिटिव्ह

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात शेकडोंच्या संख्येत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यापैकी ७ पोलीस अधिकारी आणि २३ पोलीस कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. कोरोना संशयित असणाऱ्या इतर पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

आकडेवारी काय सांगते?

१) मुंबई ३८३२, ठाणे शहर १२१८, नवी मुंबई ४५८, पुणे शहर ६७२०, पिपरी – चिंचवड ४१७४, नागपूर शहर ३००१, नाशिक शहर २९१९, औरंगाबाद ३५०, सोलापूर ३४६९, कोल्हापूर २६५०, जळगाव १६०१, अहमदनगर ४९४४, पुणे ग्रामीणमध्ये ३०८४ गुन्हे दाखल झाले आहेत. इतर जिल्ह्यांची गुन्ह्यांची संख्या हजारांच्या आत आहे.

२) मुंबई वगळता इतर जिल्ह्यांत पोलिसांवर झालेल्या हल्ले प्रकरणात १०२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मुंबईत अशा एकाही गुन्ह्याची नोंद नाही.

३) राज्यभरात पोलीस नियंत्रण कक्षात १०० क्रमांकावर हजारोंच्या संख्येने तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये मुंबई १८६७१, ठाणे शहर २३५५, नवी मुंबई २१३१, पुणे ६८१२, पिंपरी -चिंचवड ११२६, नागपूर १८८३२, नाशिक ५३७, सोलापूर १७३४, औरंगाबाद ५५, जळगाव ३४४ आणि अहमदनगर १२२६ यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -