हजारो पदे भरणार, कोरोना भत्ता देणार; महाजनांच्या आश्वासनानंतर ‘मार्ड’चा संप मागे

MARD Strike | निवासी वसाहतीमधील समस्या, महागाई भत्ता, कोरोना भत्ता, रिक्त पदे भरणे आदी प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी व राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारला होता. मात्र सोमवारी रात्री उशिरापर्यंत संपाबाबत तोडगा न निघाल्याने सदर निवासी डॉक्टरांनी मंगळवारी दिवसभर आपला संप सुरूच ठेवला होता.

mard

MARD Strike | मुंबई – ‘मार्ड’ संघटनेचे सदस्य असलेल्या निवासी डॉक्टरांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेअंती सोमवारपासून सुरू असलेला संप अखेर मागे घेतला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

१,४३२ पदे भरली जातील, निवासी डॉक्टरांची देणी अदा करण्यात येतील व वसतीगृहातील समस्या दूर करण्यात येतील उर्वरित मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे. मात्र मुंबईतील निवासी डॉक्टरांच्या कोरोना भत्ता व वसतीगृह याबाबतच्या काही मागण्यांबाबत पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याशी बुधवारी चर्चा करण्यात येणार असल्याचे मार्डशी संबंधित मुंबईतील निवासी डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा MARD Strike : रुग्णांचे हाल, शस्त्रक्रिया रखडल्या; पण मागण्यांसाठी डॉक्टर ठाम

‘मार्ड’चे सदस्य असलेल्या सरकारी व पालिका रुग्णालयातील सात हजार निवासी डॉक्टरांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन करीत संप सुरू केला होता. निवासी वसाहतीमधील समस्या, महागाई भत्ता, कोरोना भत्ता, रिक्त पदे भरणे आदी प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी व राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारला होता. मात्र सोमवारी रात्री उशिरापर्यंत संपाबाबत तोडगा न निघाल्याने सदर निवासी डॉक्टरांनी मंगळवारी दिवसभर आपला संप सुरूच ठेवला होता. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी उशिराने मंत्री गिरीश महाजन यांनी मार्डच्या निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. निवासी डॉक्टरांसाठी नवीन वसतीगृह बांधणार, ज्या ठिकाणी सुविधा नाही मिळत तेथे सत्व सुविधा उपलब्ध करणार, मुंबई महापालिकेशी निगडित निवासी डॉक्टरांच्या कोरोना भत्ता, वसाहतीबाबतच्या मागण्यांबाबत पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या सोबत बुधवारी चर्चा करून अंतिम तोडगा काढण्यात येणार आहे.

दोन दिवसांच्या डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे चांगलेच हाल झाले. मात्र आता संप मिटल्याने मुंबईसह राज्यातील सरकारी व पालिका रुग्णालयातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – निवासी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, 15 दिवसांची मुदत मागत वैद्यकीय मंत्र्यांचे आवाहन