भाजपच्या प्रसाद लाड यांना धमकीचे फोन, सहपोलीस आयुक्तांना पत्र लिहीत व्यक्त केली भीती

Prasad Lad

दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय उलथापालथ संपुष्टात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. अशातच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड  यांनी आपल्याला धमकीचे फोन आले असल्याची तक्रारी मुंबईच्या गुन्हे शाखेकडे केली आहे. सतत दोन दिवसापासून फोन येत असल्याने लाड यांनी गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये माझा जिवाला धोका असल्याची भिती प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या चौकशीसाठी सीडीआर काढण्यास माझी हरकत नाही, असे लाड यांनी पत्रात म्हटले आहे. या धमकी प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी लाड यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा –

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी 11 वाजता फडणवीस यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस एक-दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. बुधवारी रात्री 11.15 च्या सुमारास उद्धव ठाकरे स्वत: राजीनाम्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले होते. त्यांच्यासोबत कारमधून आदित्य आणि तेजस ठाकरे आणि शिवसैनिक देखील होते. राज्‍यपालांकडे राजीनामा सोपवून उध्‍दव ठाकरे आणि शिवसैनिकांचा ताफा मातोश्रीकडे रवाना झाला होता.