घरमहाराष्ट्रखालापूर, पेण, रोहेमध्ये तीन अपघात

खालापूर, पेण, रोहेमध्ये तीन अपघात

Subscribe

एकाचा मृत्यू, १४ जखमी

दुचाकी एसटी बसवर आदळून पती ठार, पत्नी जखमी
भरधाव दुचाकीची समोरून येणार्‍या एसटी बसला धडक बसून दुचाकीवरील दाम्पत्यापैकी पती जागीच ठार, तर पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वर्टसिला कंपनीजवळ झाला.

अशोक पाटील (40, रा.मळवली, लोणावळा) हे त्यांची पत्नी अश्विनीसह दुचाकीवरून लोणावळ्याच्या दिशेने निघाले होते, तर बस खोपोली येथून पनवेलकडे निघाली होती. दुचाकी अनियंत्रित झाल्याने थेट समोरून येणार्‍या बसवर आदळल्याने पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी अश्विनी किरकोळ जखमी झाली. दरम्यान, अपघातामुळे रूंदीकरणाची मागणी झालेला खालापूर ते खोपोली हा 7 किलोमीटर अंतराचा रस्ता ठेकेदाराच्या निष्काळजीपणा अपघाताचे कारण बनला आहे. आवश्यक सूचना फलक नसल्याने खोदलेले रस्ते, एकेरी वाहतुकीचे फलक, वेग मर्यादा याची वाहनचालकाला माहिती मिळत नसून अपघात घडत आहेत.

- Advertisement -

कार पुलावरून कोसळली, तिघे जखमी
कार पुलावरून 15 फूट खाली कोसळल्यामुळे त्यात तिघेजण जखमी झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर शहरानजीक शुक्रवारी पहाटे 1.30 वाजता घडली.गुरुवारी रात्री टाटा नेक्सन कारने (एमएच 05-5576) कल्याण येथून राजेश शशिकांत मोरे (26), संध्या नथुराम पाटील (19) आणि प्रिती दत्तू कडवे (23) श्रीवर्धनकडे निघाले होते. कार हॉटेल झी गार्डनजवळ आली असता नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून थेट खाली कोसळली. केवळ दैव बलवत्तर म्हणून तिघे जखमी होण्यावर निभावले. त्यांच्यावर येथील उप जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसटी बस झाडावर आदळून 10 जखमी
माणगावकडून रोह्याकडे येणारी बस झाडावर आदळून चालक, वाहकासह 10 प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी रोहे-कोलाड मार्गावर संभे गावानजीक ही दुर्घटना घडली.रोहे आगाराच्या या बसच्या (एमएच 14 बीटी 1945) समोरून अज्ञात वाहन चुकीच्या पद्धतीने येत असल्याचे दिसताच चालक सूर्यकांत मारुती पानसे यांनी प्रसंगावधान राखून बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नेमका त्याचवेळी टायर रॉड तुटून नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली. बसमध्ये 30 हून अधिक प्रवासी होते. अपघातात पानसे, वाहक एस. बी. पवार यांच्यासह शालिनी मोरे (रा. महादेव वाडी), फरिदा कुमेकर (रा. बोर्ली मांडला), राम मालुसरे, पूनम जाधव (रा. धरणाची वाडी, माणगाव), पूजा देशमुख (रा.शेडसई), विकी शेडगे (रा. चोरडे, मुरुड), सुमन तिकोने (रा. आंबेवाडी), तसेच अन्य एक प्रवासी जखमी झाला. जखमींवर येथील शासकीय उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -