नरवीर तानाजी मालुसरेंच्या इतिहासाची साक्ष देणारे शिवकालीन झाड कोसळले

राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत पाणी साचले आहे. साचलेले पाणी घराघरांत शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. झाडेही मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली आहेत.

राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत पाणी साचले आहे. साचलेले पाणी घराघरांत शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. झाडेही मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली आहेत. यामध्ये एका शिवकालीन झाडाचाही समावेश आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या इतिहासाची साक्ष देणारे हे शिवकालीन झाड होते. याबाबत राष्ट्रवदीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करत माहिती दिली.

“नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारे पोलादपूर येथील ३५० वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड काल पावसामुळे कोसळल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. या झाडाने मावळ्यांचा पराक्रम पाहिला असेल, यात तटबंदीही कोसळली. वेदनादायी चित्र”, असे अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील कर्मभूमितील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारक परिसरातील पुरातन आंब्याचे झाड होते. झाड कोसळल्याने स्मारकाच्या परिसरात असलेली तटबंदी देखील तुटली आहे. झाड कोसळ्याची माहिती मिळताच पोलादपूर येथील नरवीर रेस्क्यू टीम मार्फत हे झाड बाजूला करण्यात आले.

या झाडाचा इतिहास म्हणजे या आंब्याच्या ढोलीमध्ये मावळे हे तलवारी आणि हत्यारे लपवित असल्याची आख्यायिका सांगितली जाते.

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik) आणि गडचिरोली या शहरांना (Gadchiroli) आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


हेही वाचा – द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेच्या खासदारांचा पाठिंबा, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य